Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीआयई तर्फे पुण्यात 21 व 22 फेब्रुवारी रोजी दहाव्या टायकॉन परिषदेचे आयोजन

टीआयई तर्फे पुण्यात 21 व 22 फेब्रुवारी रोजी दहाव्या टायकॉन परिषदेचे आयोजन

पुणे,13 फेब्रुवारी 2025 : स्टार्टअप्स व नवउद्योजकतेसाठी समर्पित असलेल्या द इंडस आंत्रप्रेन्युअर्स (टीआयई) या ना नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेने 21 व 22 फेब्रुवारी 2025 रोजी हॉटेल वेस्टीन,कोरेगाव पार्क येथे टायकॉन 2025 परिषदेचे आयोजन केले आहे. या परिषदेमध्ये प्रमुख एंजल गुंतवणूकदार,स्टार्टअप फंडस,उद्योजक आणि उद्योग विचारवंतांसह सुमारे 400 ते 500 लोकं सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

या दोन दिवसीय परिषदेमध्ये पहिल्या दिवशी नवउद्योजकतेच्या महत्त्वाच्या पैलूंवर व व्यावहारिक केस स्टडीज्‌‍सह मास्टर क्लासेस व सत्रांचा समावेश असेल,तर दुसऱ्या दिवशी नवउद्योजकतेला प्रेरित करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन,चर्चासत्रे,फायरसाईड चॅटस, गुंतवणूकदारांचे मार्गदर्शन या सत्रांचा समावेश आहे.तज्ञांमध्ये कंपन्यांचे संस्थापक,गुंतवणूकदार,मुख्य कार्यकारी अधिकारी,उद्योगातील नेतृत्व,तंत्रज्ञ,क्रीडा क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्व आणि गिनिज रेकॉर्डधारक असलेल्या एका तरूण गिर्यारोहकाचा समावेश असणार आहे.

या परिषदेमध्ये मार्गदर्शन करण्यात येणाऱ्या विषयांमध्ये कल्पनेची पडताळणी करणे,बाजारपेठेतील धोरणे,विक्री,व्याप्ती वाढविणे,डिजिटल मार्केटिंग,ब्रँडिंग,डिझाईन थिंकींग,गुंतवणूक,कंपनीला गुंतवणूक करणे योग्य बनविणे,मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्यासह टीम तयार करणे,विलिनीकरण आणि अधिग्रहण (एम ॲन्ड ए) साठी नियोजन व अंमलबजावणी करणे अशा अनेक विषयांचा समावेश असेल.विशिष्ट क्षेत्राच्या विषयांमध्ये ऑटोमोटिव्ह व इलेक्ट्रॉनिक्स,सायबर सुरक्षा,हवामान व शाश्वतता,वैद्यकीय तंत्रज्ञान आणि आरोग्य सेवा,वेलनेस,डीपटेक,यांचा समावेश आहे.सध्या जगात सर्वांत चर्चेत असलेल्या कृत्रिम बुध्दिमत्ता या विषयावर तीन समर्पित सत्रे आहेत.यामध्ये एआय स्टेट ऑफ द आर्ट,एआय उपायांची व्याप्ती,विविध सीईओज्‌‍चा एआयबद्दलचा दृष्टीकोन आणि उद्योजक या तंत्रज्ञानाचा कसा फायदा घेऊ शकतात,याचा समावेश आहे.

टॉयकॉन पुणे 2025 मधील नर्चर पॅव्हेलियनमध्ये टीआयई पुणे ने राबविलेल्या सर्व 13 नर्चर कार्यक्रमांमधील मार्गदर्शक व मार्गदर्शन प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचे प्रदर्शन असेल.सहभागींना गुंतवणूकदार,उद्योगातील नेतृत्व,प्रख्यात उद्योजक यांच्याशी संपर्क साधण्याची संधी मिळेल.नर्चर हा टीआयई पुणे तर्फे 2012 साली सुरू करण्यात आलेला रचित उपक्रम असून जगभरातील अनेक टीआयई चॅप्टर्सने स्विकारला आहे.

टीआयईचे जागतिक विश्वस्त व टायकॉन 2025 परिषदेचे अध्यक्ष किरण देशपांडे म्हणाले की, पुण्यात भारतातील सर्वांत वैविध्यपूर्ण उद्योजकीय परिसंस्था आहेत. टायकॉन 2025 केवळ पुण्यातीलच नव्हे तर संपूर्ण भारतातील सर्व प्रकारच्या नवउद्योजकांच्या मार्गदर्शनाबाबतच्या गरजा पूर्ण करेल.

टीआयई पुणेचे अध्यक्ष व संस्थापक र्चाटर सदस्य अजय भागवत म्हणाले की, नर्चर पॅव्हेलियन आणि मास्टर क्लासेस हे दोन्ही उपक्रम सहभागींना अर्थपूर्ण नेटवर्किंगसाठी एक उत्तम संधी प्रदान करतात.

पुण्याच्या बाहेरून येणाऱ्या सहभागींसाठी हेरिटेज वॉक,प्रसिध्द सिंहगड किल्ल्याचा ट्रेक,नाटक,संगीत असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

टीआयई (द इंडस आंत्रप्रेन्युअर्स) ही नवउद्योजकतेला चालना देणारी ना नफा तष्वावर कार्यरत संस्था आहे. टीआयईचे उपक्रम मार्गदर्शन,शिक्षण,नेटवर्किंग,गुंतवणूक आणि इनक्युबेटिंग या पाच स्तंभांवर आधारित असतात. टीआयईचे जगभरात सुमारे 65 चॅप्टर्स आहेत.टीआयई चार्टर सदस्य हे अनुभवी उद्योजक असून समाजाला परत काही देण्यासाठी टीआयईचा भाग बनतात.टीआयईच्या परिसंस्थेमध्ये टीआयई पुणे ही अग्रगण्य शाखा आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments