मोहाली, पंजाब; 27 फेब्रुवारी 2025: उदयती फाउंडेशनने महिंद्राच्या स्वराज डिव्हिजन आणि स्वराज इंजिन्स लिमिटेड (स्वराज) यांनी शॉप फ्लोअरवर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रगतीचा लेखाजोखा मांडणारा अभ्यास प्रसिद्ध केला आहे.
या अभ्यासात स्वराजने महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना ठळकपणे मांडले आहे – 2013 मध्ये केवळ 1.5% असलेली महिलांची संख्या 2024 मध्ये 10% पेक्षा जास्त वाढली आहे. त्यायोगे भारताच्या ट्रॅक्टर उत्पादन क्षेत्रासाठी एक नवीन मापदंड प्रस्थापित झाला आहे. महिला कर्मचाऱ्यांचा अनुपस्थिती दर कमी असून त्यांची कामात स्थिरपणे राहण्याची क्षमता अधिक असून त्याद्वारे उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढीस लागली आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्रात महिलांचा समावेश होण्याची गरज अधिक ठळकपणे अधोरेखित होते.
तांत्रिक शिक्षणामध्ये मर्यादित प्रवेश, सांस्कृतिक विरोध आणि सुरक्षिततेच्या चिंता अशी आव्हाने असतानाही स्वराजने या अडथळ्यांवर मात करण्यासाठी निश्चित लक्ष्य असलेले उपक्रम राबवले आहेत.
यातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी म्हणजे महिलांना फाउंड्री सुविधांमध्ये समाविष्ट करणे. हे क्षेत्र पारंपरिकरित्या पुरुषप्रधान क्षेत्र मानले जाते आणि तिथे शारीरिक सहनशक्ती आणि तांत्रिक कौशल्यांची आवश्यकता असते.
या परिवर्तनामागील मुख्य कारणे:
· पुनर्रचना करण्यात आलेली कामाची ठिकाणं उत्पादकांच्या भूमिका अधिक सर्वसमावेशक करण्यात मोलाची भूमिका बजावतात. रोबोटिक्स, उंच प्लॅटफॉर्म्स आणि ग्रॅव्हिटी मेकॅनिझमसह एर्गोनॉमिक सुधारणा केल्यामुळे शारीरिक श्रम कमी होऊन कार्यक्षमता वाढली आहे.
· 15 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), 5 पॉलिटेक्निक्स आणि अॅडव्हान्स्ड टेक्निकल इन्स्टिट्यूट्स यांच्याशी सहयोग करून मजबूत कौशल्य पुरवठा साखळी तयार करण्यात आली आहे.
· विशेष प्रशिक्षण कार्यक्रम जसे की कौशल्य सुधारण्यासाठी मॉड्युल्स आणि ऑन-द-जॉब प्रशिक्षण महिला कर्मचाऱ्यांना उत्कृष्टता मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्ये पुरवून सक्षम करतात.
· GPS-सक्षम वाहतूक, बडी सिस्टम आणि महिला सुरक्षा रक्षकांसारख्या सुरक्षितता उपायांमुळे सुरक्षित आणि सहाय्यक वातावरण सुनिश्चित होते.
पालकांसाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन, शॉप फ्लोअरचे दौरे घडवून आणत स्वराजने समाजासोबत सक्रिय सहभाग घेतला. यामुळे सांस्कृतिक अडथळे दूर करण्यात मदत झाली आणि महिलांना उत्पादन क्षेत्रात करिअर करण्यास प्रोत्साहन मिळाले. उदयती फाउंडेशनच्या संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा गोयल या प्रयत्नांचे कौतुक करताना म्हणाल्या, “स्वराजचा प्रवास कौशल्य, पायाभूत सुविधा आणि समाजातील सहभाग यामध्ये केलेल्या गुंतवणुकीचा परिवर्तनशील प्रभाव अधोरेखित करतो. हे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि भारताच्या विकासकथेस मोठा हातभार लावण्यासाठी उत्पादन क्षेत्राने अवलंबावे असे अनुकरणीय मॉडेल सादर करते.”
या यशांनंतरही काही आव्हाने कायम आहेत. तांत्रिक शिक्षणामध्ये महिलांची संख्या अद्यापही कमी आहे. पंजाबमधील ITI संस्थांमध्ये एकूण 17,000 विद्यार्थ्यांपैकी केवळ 400 विद्यार्थीनी डिझेल मेकॅनिक्स आणि मशीनिस्ट सारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतला आहे. याशिवाय, कंत्राटी भूमिकांवरील अवलंबनामुळे महिलांसाठी दीर्घकालीन करिअर वाढीच्या संधी मर्यादित राहतात. या अडथळ्यांवर मात करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि व्यवस्थेत बदल आवश्यक आहेत.
स्त्री पुरुष समानतेला प्राधान्य दिल्यास कार्यबल अधिक सक्षम होते आणि कार्यप्रणाली उत्कृष्ट होते हे स्वराजच्या उल्लेखनीय प्रगतीतून दिसून येते. ही प्रगती विविध उद्योगांमधील कंपन्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकते आणि त्यामुळे भारताच्या आर्थिक क्षेत्रात महिलांना समान संधी मिळेल, त्यांच्या क्षमता खुल्या होऊन त्यांचे योगदान वाढू शकेल.


