पुणे,3 मार्च 2025 : द फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक ॲन्ड गायनेकोलॉजीकल सोसायटीज् ऑफ इंडिया (फॉग्सी) चा शैक्षणिक विभाग असलेल्या द इंडियन कॉलेज ऑफ ऑब्स्टेट्रिक्स ॲन्ड गायनेकोलॉजीस्ट (आयसीओजी) ने पुणे स्त्रीआरोग्य व प्रसूतीशास्त्रज्ञ (पीओजीएस) संघटनेच्या सहकार्याने 10 वी फॉग्सी – आयसीओजी वार्षिक परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले होते. या परिषदेची संकल्पना अप २ डेट – फंडामेंटल टू ॲडव्हान्सड अशी होती
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी फॉग्सीच्या अध्यक्षा डॉ.सुनिता तांदूळवाडकर, आयसीओजी चे अध्यक्ष डॉ.पराग बिनीवाले, पीओजीएसच्या अध्यक्षा डॉ.आरती निमकर,परिषदेचे सहअध्यक्ष डॉ.किरण कुर्तकोटी,आयोजन समितीच्या सचिव डॉ.सरिता भालेराव,डॉ.चैतन्य गणपुले व इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन सोहळ्यात आयसीओजी, फॉग्सी व पीओजीएसची संशोधन पध्दती,थायरॉईड, पीसीओएस , मिडलाईफ या सारख्या अनेक विषयांवर लिहिलेली पुस्तके आणि पीओजीएसची नियतकालिका (पीओजीएस इंडक्स जर्नल) यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
या दोन दिवसीय परिषदेमध्ये स्त्रीरोग व प्रसूती शास्त्रातील विविध वैद्यकीय सत्रे,कार्यशाळा व व्याख्याने यांचा समावेश होता. एका विशेष दीक्षांत समारंभात स्त्रीरोग चिकित्सा क्षेत्रातील डॉक्टरांना प्रगत अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल फेलोशिप प्रमाणपत्र देण्यात आले. संपूर्ण भारतभरातील तरूण डॉक्टरांनी विविध विषयावर 100 हून अधिक शोधनिबंध व पोस्टर्सचे सादरीकरण केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.सुरेश गोसावी यांनी विद्यापीठात नॅनो मटेरियल्ससह वैद्यकीय तंत्रज्ञानाबाबत चाललेल्या संशोधनाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, समाजाला उपयुक्त ठरेल असे वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शिक्षण व वैद्यकीय क्षेत्राने एकत्र येणे गरजेचे आहे.
फॉग्सीच्या अध्यक्षा डॉ.सुनिता तांदूळवाडकर म्हणाल्या की, या परिषदेला मिळालेला प्रतिसाद आयसीओजीची लोकप्रियता दर्शविते.
आयसीओजी तर्फे शैक्षणिक उपक्रमांचा विस्तार
आयसीओजीचे अध्यक्ष डॉ.पराग बिनीवाले म्हणाले की,आयसीओजीची स्थापना 1984 साली फॉग्सीचा एक शैक्षणिक विभाग म्हणून झाली होती.स्त्रीरोग व प्रसूती रोगशास्त्र क्षेत्रात शिक्षण,प्रशिक्षण व संशोधनाला प्रोत्साहन देणे हे या संस्थेचे उद्दिष्ट आहे. पुण्यात प्रथमच आयसीओजीची वार्षिक परिषद पार पडली असून यामध्ये 300 हून अधिक डॉक्टरांनी सहभाग घेतला.नजिकच्या काळात आयसीओजी तर्फे ॲकेडेमिक्स ॲन्ड परस्पेक्टिव्हज् या शैक्षणिक उपक्रमाद्वारे फॉग्सीच्या छोट्या शाखांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आम्ही करू.पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी हार्मनी या नवीन उपक्रमाद्वारे स्त्रीरोग व एंडोक्रिनोलॉजी यासाठी ऑनलाईन क्लासेस या महिन्यात सुरू होतील.याशिवाय क्षमता आधारित पदव्युत्तर अध्यापनावर लक्ष केंद्रित करत शिक्षकांसाठी मास्टर क्लासेस सुरू केले जातील. रॉयल कॉलेज ऑफ युके,रॉयल कॉलेज ऑफ ऑस्ट्रेलिया ॲन्ड न्युझीलंड, युरोपियन बोर्ड कॉलेज आणि श्रीलंकेतील कॉलेज यांच्या सहकार्याने शैक्षणिक कार्यक्रम सुरू राहतील.
पीओजीएसच्या अध्यक्ष डॉ.आरती निमकर म्हणाल्या की,पीओजीएस,फॉग्सी,एएमओजीएस व आयसीओजी या सर्व संस्थांचे सध्याचे अध्यक्ष हे पीओजीएसचे सदस्य असून ही एक अभिमानास्पद बाब आहे.
आयसीओजीच्या सचिव डॉ.सरिता भालेराव यांनी आयसीओजीच्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली. डॉ.चैतन्य गणपुले यांनी आभार प्रदर्शन केले.


