पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा अभिनव उपक्रम; विविध विषयांवर झाले विचारमंथन*
पिंपरी, दि. ३ मार्च २०२५ : पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापनेस येत्या २०३२ मध्ये पन्नास वर्षे पुर्ण होत आहेत. आजपर्यंतच्या प्रवासात पिंपरी चिंचवड शहराने बेस्ट सिटी ते स्मार्ट सिटी असा विकासाचा गतीमान टप्पा गाठला आहे. सुवर्णपुर्ती वर्षामध्ये या शहराला डिजीटल शहर करून नागरी सहकार्यातून जागतिक दर्जाचे आधुनिक शहर बनविण्यासाठी व्हिजन@५० चा संकल्प दिशादर्शक आणि फायदेशीर ठरेल, असा विश्वास आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थापनेस २०३२ मध्ये ५० वर्षे पुर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने महापालिकेने व्हिजन@५० शहर धोरण हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत ताम्हिनी जवळील गरूड माची येथे महापालिकेच्या विविध विभागांच्या प्रमुखांचा सहभाग असलेली दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत व्हिजन@५० उपक्रमाबद्दल चर्चात्मक मंथन करण्यात आले. यावेळी सहभागी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
या कार्यशाळेस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रवीण जैन, मुख्य लेखा परिक्षक प्रमोद भोसले, नगररचना उपसंचालक प्रसाद गायकवाड, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्यासह विविध विभागांचे सहशहर अभियंता, उपआयुक्त, सहाय्यक आयुक्त, कार्यकारी अभियंता, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी शहर परिवर्तन कार्यालयासाठी नियुक्त पॅलेडियम संस्थेच्या तज्ञ मार्गदर्शकांनी गेल्या दोन महिन्यांपासून व्हिजन@५० उपक्रमाअंतर्गत विविध भागधारकांसोबत केलेल्या गटचर्चांमधून आलेल्या प्राथमिक निरीक्षणांवर सविस्तर करण्यात आली.
आयुक्त शेखर सिंह म्हणाले, नागरिकांच्या गरजा प्रामुख्याने विचारात घेऊन शहरात दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा महापालिकेचा प्रयत्न असेल. आजचे जग वेगाने आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सेवा सुविधांमध्ये परिवर्तीत होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर सर्व स्तरावर केला जात आहे. अशावेळी महापालिकेचा प्रशासकीय कारभार देशील अशा तंत्रज्ञानावर आधारित असणे काळाजी गरज आहे. नागरिकांना जलद आणि दर्जेदार सुविधा देत असताना पुढील वर्षांचा विचार करून पायाभूत सुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने कार्यशाळा दिशादर्शक ठरणार आहे. शहराची संस्कृती जपत कला, संस्कृती, क्रीडा क्षेत्रात शहराचा सर्वार्थाने विकास साधण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. ही संपुर्ण प्रक्रिया पार पाडत असताना शहरातील सर्व घटकांचे मत विचारात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने चर्चासत्रे आणि संवादसत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याद्वारे प्राप्त सूचना सूचना आणि माहितीचा एकत्रित अंतर्भाव करून महापालिका स्वतंत्र आराखडा तयार करणार आहे. शासन तसेच लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा देखील यामध्ये अंतर्भाव असणार आहे. त्यानुसार आवश्यक धोरणे आखून त्याप्रमाणे नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यासाठी महापालिका कार्यवाही करणार आहे. त्यातून नव्याने विविध उपक्रम आणि योजना विकसित केल्या जाणार आहेत.
राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर शाश्वत विकासाच्या दृष्टीने सुरू असलेले प्रयत्न तसेच विकसित झालेल्या सेवा सुविधांचा अभ्यास करून महापालिकेच्या व्हिजन@५० मध्ये समावेश केला जाणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग आणि वातावरण बदलांचा विचार करून शहराच्या शाश्वत विकासाचे ध्येय ठेऊन हा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यादृष्टीने कार्यशाळेत झालेले मंथन आणि चर्चा महत्वपुर्ण ठरणार आहे, असेही आयुक्त सिंह यावेळी म्हणाले.
कोट
शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शाश्वत विकास आवश्यक असून त्यासाठी योग्य नियोजन करून धोरण आखणे गरजेचे आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शहराचा शाश्वत विकास साधल्यास औद्योगिक नगरी ही स्मार्ट सिटी म्हणून ओळखली जाईल. पिंपरी चिंचवड महापालिका ही संगणक क्षेत्रात उच्च दर्जाचे काम करणारी महापालिका आहे. सर्व विभागांचे डिजिटायझेशन व्हावे यासाठी महापालिका प्रयत्नशील असून नागरिकांना सर्वोत्तम सुविधा सहजरित्या प्राप्त व्हाव्यात हा यामागचा उद्देश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील विविध भागधारकांसमवेत चर्चा करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत त्यांच्याकडून प्राप्त सूचना आणि मतांचा अंतर्भाव करण्यात येणार आहे. या कार्यशाळांमध्ये बांधकाम व्यावसायिक, व्यावसायिक, राजकीय व्यक्ती, उद्योजक आदींची मते जाणून घेऊन २०३२ पर्यंतचे धोरण ठरविण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या शाश्वत विकासामध्ये या कार्यशाळेतील चर्चेचा निश्चितपणे उपयोग होणार आहे.
विठ्ठल जोशी, उप आयुक्त, प्रशासन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
*चौकट – शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने आवश्यक विविध मुद्द्यांवर करण्यात आली चर्चा*
व्हिजन@५० शहरी धोरण उपक्रमाअंतर्गत शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि नागरी कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. या सर्व विषयांना केंद्रस्थानी ठेऊन महानगरपालिकेने आराखडा तयार केला आहे. या आराखड्याच्या आधारे कार्यशाळेत सहभागी झालेल्या अधिकाऱ्यांनी विचारमंथन केले. त्यामध्ये भविष्यात उद्भवण्याची शक्यता असणाऱ्या विविध समस्यांवर कशी मात करता येईल, यासाठी कोणत्या उपाययोजना उपयुक्त ठरतील यावरही या दोन दिवसीय कार्यशाळेत सविस्तर चर्चा करण्यात आली.
*चौकट – व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमाबद्दल थोडक्यात…*
व्हिजन@५० शहर धोरण उपक्रमाअंतर्गत येत्या ७ वर्षात महापालिका सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये सुधारणा करण्यासाठी दीर्घकालीन धोरण विकसित करणे, पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगिण विकास करणे, शहरातील प्रत्येक नागरिकाला शहराची ओळख निर्माण करणेकामी विकास धोरणात समाविष्ट करणे, चिरस्थायी पर्यावरणपुरक शहर आणि शहराची वेगळी ओळख निर्माण करणे व शहर विकासासाठी आवश्यक परिणामांची वेगवान अंमलबजावणी करणे आणि महानगरपालिकेचे कामकाज आणखी पारदर्शक होणेकामी शहरातील नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर भर देणे आदी गोष्टींचा समावेश आहे. ही सर्व उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी शहरी गतिशीलता, पर्यावरण आणि राहणीमान, शिक्षण आणि कल्याण, तंत्रज्ञान आणि प्रशासन, शहरी पायाभूत सुविधा, आर्थिक विकास या प्रमुख विषयांवर लक्ष केंद्रित केले जाणार आह


