!
पुणे, बुधवार, १२ मार्च २०२५:-
मिशन आर्थ्रायटिस इंडिया (माई ) तर्फे राष्ट्रीय रुग्ण परिषद, रविवार, दिनांक २३ मार्च २०२५ रोजी हॉटेल रामी ग्रँड, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत पार पडेल. त्यानंतर मनोरंजन आणि भोजनाचा कार्यक्रम होईल. या परिषदेत १०० हून अधिक रुग्ण आणि १५ ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट एकत्र येऊन ऱ्हुमॅटॉइड आर्थ्रायटिसच्या विविध पैलूंबाबत चर्चा करतील.
‘मिशन आर्थ्रायटिस इंडिया’ (माई ) बद्दल:-
‘मिशन आर्थ्रायटिस इंडिया’ (माई) ही एक नोंदणीकृत चॅरिटेबल ट्रस्ट संस्था आहे. २००० साली स्थापन झालेल्या या संस्थेचे आर्थ्रायटिस आणि ऱ्हुमॅटिझम रुग्णांसाठी एक स्वयंसेवी आधार आणि समर्थन गट म्हणून कार्य सुरू आहे. श्रीमती शरयू भट यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या उपक्रमाला डॉ. अरविंद चोप्रा, श्रीमती दीपा मेहता, श्रीमती शिवानी बर्वे आणि अनेक रुग्णांचा पाठिंबा लाभला आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. चंद्रशेखर एस, अध्यक्ष – इंडियन ऱ्हुमॅटॉलॉजी असोसिएशन (IRA) उपस्थित राहतील, तर श्रीमती मनीषा सांगवी या सन्माननीय अतिथी असतील.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण:-
• कै. श्री पी. सी. नहार व्याख्यान पुरस्कार
• CRD वात विरुद्ध योद्धा पुरस्कार
• श्री हरिनारायण राठीजी वात विरुद्ध योद्धा पुरस्कार
याशिवाय लुपस (केरळ), अँकिलोझिंग स्पॉंडिलायटिस (मुंबई), स्क्लेरोडर्मा (दिल्ली), आणि शोग्रेन सिंड्रोम (अहमदाबाद) या स्व-प्रतिकारक (Autoimmune) आजारांच्या आधार आणि समर्थन गटांचे नेते देखील या परिषदेत सहभागी होतील.
दीपा मेहता, – ’माई’अध्यक्ष – म्हणाल्या , “या वर्षी आम्ही ‘माई’ चे रौप्यमहोत्सवी वर्ष (सिल्वर ज्युबिली) साजरे करत आहोत, त्यामुळे ही परिषद आमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. ही परिषद रुग्णांसाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे नामवंत डॉक्टरांकडून आर्थ्रायटिस बद्दल सखोल माहिती मिळू शकते. तसेच, हा गट भावनिक आधार, समंजस वातावरण आणि परस्पर अनुभव शेअर करण्यासाठी एक सुरक्षित जागा उपलब्ध करून देतो. त्यामुळे रुग्णांना आपली एकटेपणाची भावना कमी होण्यास मदत होते आणि ते अधिक आत्मविश्वासाने निर्णय घेऊ शकतात.”
वरिष्ठ ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ अरविंद चोप्रा म्हणाले की सांधे आणि हाडांच्या आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉक्टर्स आणि रुग्णामध्ये एक पूल बांधण्याची गरज होती. त्यामुळेच माई सारखी संस्था उदयास आली. जागरूकता, ज्ञान आणि सक्षमीकरण हे माई च्या कार्याचे मुख्य स्तंभ आहेत.
डॉ. पराग संचेती, अध्यक्ष – संचेती हॉस्पिटल म्हणाले, “दीर्घकालीन आजारांमुळे भावनिक आणि मानसिक संतुलन बिघडू शकते. आर्थ्रायटिस च्या व्यवस्थापनासाठी एक सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे. औषधोपचारांसोबत फिजिओथेरपी, व्यायाम, संतुलित आहार आणि मन रमवण्यासाठी एखादा छंद किंवा काम यांचा समावेश करणे गरजेचे आहे. वेदना कमी करण्यासाठी योग्य त्या मदतीचे स्रोत आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन वेळेत मिळणे आवश्यक आहे. यामध्ये ‘माई’ सारख्या रुग्ण समर्थन संस्था फार महत्त्वाची भूमिका बजावतात.”
वरिष्ठ ऱ्हुमॅटॉलॉजिस्ट डॉ.अरविंद चोप्रा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी WHO COPCORD कार्यक्रमांतर्गत भारतातील विविध भागांमध्ये सर्वेक्षण करून ऱ्हुमॅटिक वेदना आणि आर्थ्रायटिस च्या मोठ्या प्रमाणा वरील समस्या ओळखल्या आहेत. विशेषतः महिलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात आढळतो.


