पुणे, २१ एप्रिल २०२५: महिला सक्षमीकरण आणि शाश्वत गतिशीलतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत महाराष्ट्र सरकारने पिंक ई-रिक्षा’ योजना सुरू केली आहे. महिला व बालविकास विभागाच्या नेतृत्वाखाली या उपक्रमाची पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या ८ जिल्ह्यांमध्ये १०,००० पर्यावरणपूरक कायनेटिक ग्रीन इलेक्ट्रिक तीन-चाकी रिक्षा तैनात करण्याची योजना आहे, ज्यामुळे महिला सक्षम होतील आणि पर्यावरणाला चालना मिळेल.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार, महिला व बालविकास मंत्री श्रीमती अदिती तटकरे, कायनेटिक ग्रीनचे सह-संस्थापक व कार्यकारी संचालक रितेश मंत्री,विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी २१ एप्रिल रोजी पुणे येथे झालेल्या एका कार्यक्रमात महिला लाभार्थ्यांना पिंक ई-रिक्षा सुपूर्द केल्या.
या योजनेअंतर्गत, महाराष्ट्र सरकार प्रत्येक ई-रिक्षाच्या किमतीवर २० टक्के अनुदान देईल, तर लाभार्थी १० टक्के डाउन पेमेंट म्हणून देतील. उर्वरित ७० टक्के रक्कम प्रमुख वित्तीय भागीदारांनी दिलेल्या बँक कर्जाद्वारे वित्तपुरवठा केली जाईल, ज्यामुळे सुलभ आणि कमी व्याजदरामध्ये आर्थिक साह्य मिळेल. याव्यतिरिक्त, महाराष्ट्र सरकार व कायनेटिक ग्रीन लाभार्थ्यांना गुंतवून ठेवण्यासाठी आणि बचत गटाशी सहयोग करण्यासाठी विविध ठिकाणी प्रत्यक्ष उपक्रम राबवतील. त्यांना अधिक पाठिंबा देण्यासाठी कायनेटिक ग्रीन मोफत ड्रायव्हिंग प्रशिक्षण देईल, ड्रायव्हिंग लायसन्स मिळविण्यात मदत करेल आणि मजबूत चार्जिंग पायाभूत सुविधा उभारेल. कायनेटिक ग्रीन आठ सहभागी जिल्ह्यांमध्ये १५०० चार्जर्स तैनात करण्यासाठी कटिबद्ध आहे, जेणेकरून योजनेच्या प्राप्तकर्त्यांना सर्वांगीण सोल्यूशन उपलब्ध होईल. तसेच, वाहन आणि बॅटरी पाच वर्षांच्या वॉरंटीसह येतील, तसेच सर्व नियतकालिक आणि प्रतिबंधात्मक मेन्टेनन्स सेवांचा समावेश असलेल्या सर्वसमावेशक अॅन्युअल मेन्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट (एएमसी)चा समावेश असेल, ज्यामध्ये पाच वर्षांसाठी प्रत्येक तिमाहीत एक मोफत सेवा देण्यात येईल.
कायनेटिक ग्रीन महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि विविध राइड-हेलिंग सेवा प्लॅटफॉर्मसह सक्रियपणे धोरणात्मक भागीदारी करत आहे. हा सहयोग प्रवाशांसाठी पहिल्या आणि शेवटच्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीचे महत्त्वाचे पर्याय प्रदान करण्यासाठी करण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, हा उपक्रम विश्वासार्ह आणि खात्रीशीर उत्पन्नाचा स्रोत निर्माण करतो, तसेच त्यांना सुलभ आणि पर्यावरणपूरक परिवहन सोल्यूशन्सच्या माध्यमातून सक्षम करतो.
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या संस्थापक व सीईओ सुलज्ज फिरोदिया मोटवानी म्हणाल्या, “कायनेटिक ग्रीनमध्ये आम्ही शाश्वत गतीशीलता सोल्यूशन्सच्या माध्यमातून अर्थपूर्ण परिवर्तनाला चालना देण्याप्रती दृढ कटिबद्ध आहोत. पिंक ई-रिक्षा योजना या दृष्टिकोनाला प्रबळपणे सादर करते, तसेच पर्यावरणीय स्थिरतेसह महिलांच्या सक्षमीकरणाला गती देते. महिलांना उदरनिर्वाहाच्या विश्वसनीय व प्रतिष्ठित स्रोतासह सुसज्ज करत आम्ही त्यांच्या आर्थिक पैलूंमध्ये परिवर्तन घडवून आणत आहोत, तसेच त्यांच्या आत्मविश्वास आणि स्वावलंबीपणा देखील जागृत करत आहोत. हा उपक्रम प्रबळ समुदाय आणि शुद्ध व पर्यावररणाप्रती जागरूक भविष्य घडवण्याच्या दिशेने पाऊल आहे, जेथे प्रत्येक महिलेला प्रगती करण्याची आणि शाश्वत विश्वाप्रती योगदान देण्याची संधी आहे. आम्ही हा उपक्रमाला यशस्वी करण्यामध्ये अविरत पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्र सरकारचे आभार व्यक्त करतो, जेथे त्यांची धोरणे व आर्थिक साह्य महिलांना सक्षम करण्यामध्ये आणि राज्यभरात हरित गतीशीलतेच्या अवलंबतेला गती देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.”
या उपक्रमाबाबत मत व्यक्त करत कायनेटिक ग्रीनच्या मोबिलिटी अँड इंटरनॅशनल बिझनेसचे अध्यक्ष श्री. सुधांशू अग्रवाल यांनी पिंक ई-रिक्षा योजनेच्या सखोल मानवी प्रभावावर भर दिला. ते म्हणाले, “हा उपक्रम महिलांना उदरनिर्वाहाचे स्रोत देण्यासोबत त्यांच्या जीवनावर नियंत्रण ठेवण्याचा आणि समाजाप्रती अर्थपूर्णपणे योगदान देण्याचा आत्मविश्वास देखील देतो. महिलांना स्वावलंबी बनण्यास सक्षम करत आम्ही क्षमता व प्रतिष्ठेच्या संस्कृतीला चालना देत आहोत. या पिंक ई-रिक्षा आशा व प्रगतीच्या प्रतीक आहेत, सुरक्षित परिवहन पर्याय देत आहेत, तसेच पर्यावरणीय स्थिरतेला चालना देत आहेत. महाराष्ट्र सरकारसोबत सहयोगाने आम्हाला या दृष्टिकोनाला वास्तविकतेत आणण्याचा अभिमान वाटत आहे, ज्यामधून खात्री मिळते की प्रत्येक महिलेला तिचे स्वत:चे भविष्य घडवण्याची संधी आहे.”
ही योजना २० ते ५० वर्षांपर्यंतच्या स्त्रियांसाठी आहे, ज्यामध्ये विधवा, घटस्फोटीत व दारिद्ररेषेखाली जीवन व्यतित करणाऱ्या स्त्रियांना प्राधान्य देण्यात येत आहे. कायनेटिक ग्रीन ई-रिक्षा एक वेळ चार्ज केल्यानंतर १२० किमी पर्यंत चालते आणि यामध्ये ड्युअल सस्पेंशन, डिजिटल डिस्प्ले, ड्युअल हेडलाईट्स व २२० मिमीचे ग्राउंड क्लिअरन्स आदी सुविधा आहेत. हिला घरगुती १६-अॅम्पिअर सॉकेटने सहज चार्ज करता येऊ शकते.
कायनेटिक ग्रीन लाभार्थीना प्रशिक्षित करण्यासाठी एका एजन्सीची देखील नेमणूक करेल, जेणेकरून त्या आपल्या ई-रिक्षा कुशलतेने चालवू शकतील. महाराष्ट्र सरकार लैंगिक समानता व हरित परिवहनाच्या दिशेने धाडसी पाऊल उचलत असताना कायनेटिक ग्रीन अधिक समान व शाश्वत भविष्य घडवण्याचा मार्ग सुकर करत आहे.


