पुणे, 20 एप्रिल 2025 : फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात यंदा 81 प्रकारच्या पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या असून, ग्रीन वॉर्बलर, रेड ब्रेसेड फ्लायकॅचर आणि ट्री पपेट असे युरोपातून स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांचा समावेश असल्याची माहिती कॉलेजच्या नेचर क्लबने नुकत्याच केलेल्या पक्षीगणनेत आढळून आली आहे.
वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मीनाक्षी महाजन म्हणाल्या, “हे पक्षी खूप अंतर प्रवास करून भारतात येतात. त्यांचा आकार छोटा असतो. प्रवासादरम्यान त्यांचे वजन कमी होते. या कालावधीत युरोपात बर्फ आणि थंडी असते. त्यांना खाद्य मिळत नाही. ते सुरक्षित आणि खाण्यापिण्यासाठी योग्य अधिवासाच्या शोधात असतात. फर्ग्युसनचा आवार जैववैविध्य संपन्न असल्याने या परिसरात ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान ते वास्तव्य करतात.”
तांबट (कॉपरस्मिथ बार्बेट) हा पक्षी वारंवार आपल्या घरट्याकडे येताना निरीक्षणात दिसला. तो जमिनीपासून 10 ते 12 फूट उंचीवरील वाळलेल्या खोडावर खालच्या बाजूने घरटे बनवितो. त्याबरोबर घार, पोपट, मैना, वेडा राघू, स्वर्गीय नर्तक, तांबोली, शिपाई बुलबुल, घुबड हे स्थानिक पक्षी मोठ्या संख्येने आढळले.
या वर्षी 14 ते 17 फेब्रुवारी या कालावधीत पक्षी गणना करण्यात आली. त्यामध्ये 68 विद्यार्थ्यांनी सहभागी होत 81 प्रकारच्या पक्षांची नोंद केली. त्यासाठी 2186 निरीक्षणे ॲपद्वारे नोंदविण्यात आली. हा उपक्रम ग्रेट बॅकयार्ड बर्ड काउंट या जागतिक उपक्रमाचा भाग होता. कॅर्निल लॅब ऑफ ऑर्निथॉलॉजी आणि नॅशनल ऑडुबॉन सोसायटीचा त्यासाठी पुढाकार होता.
देशभरात साडेसहा हजार सहभागींनी 66 हजार निरीक्षणे सादर करीत 1086 प्रजातींचे दस्तऐवजीकरण केले. राज्यात 500 हून अधिक सहभागींनी पाच हजारहून अधिक निरीक्षणे करीत 400 प्रजातींची नोंद केली.
सिद्धांत म्हात्रे हा विद्यार्थी म्हणाला, “हवामान बदलामुळे पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. त्यांना अधिवास गमवावा लागत आहे. शहरीकरणामुळे पक्षी संकटात आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांना जागृती करण्यासाठी पक्षीगणनेसारखा उपक्रम प्रेरणादायी वाटला.”
पर्यावरणशास्त्र शिकणारी मुस्कान श्रीवास्तव म्हणाली, “या उपक्रमामुळे पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली. विज्ञान, सर्जनशीलता आणि महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांना आपले कौशल्य एकत्र उपयोगात आणता आले. त्यामुळे शिक्षणाला कृतिशील उपक्रमाची जोड मिळाली.”
डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद रावत, कार्यवाह डॉ. आनंद काटिकर, फर्ग्युसनचे प्राचार्य डॉ. विजय तडके, डॉ. मीनाक्षी महाजन यांनी मार्गदर्शन केले.


