*
पुणे, दि. १३: महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती अधिकाधिक नागरिकांना होण्यासाठी गुरुवार १५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालय पिंपरी (ता. मावळ) येथे सकाळी ११ वा. जनजागृती शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राज्यात कार्यान्वित झाली असून या योजनेअंतर्गत महिला, युवक-युवती, सुशिक्षित बेरोजगार, आदिवासी, ज्येष्ठ नागरीक, अनुसूचित जाती-जमाती, भटक्या विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग, स्वातंत्र्य सैनिक, स्वंयसेवी संस्था, महिला बचत गट, स्वयंसहाय्यता युवा गट, शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन, पारंपारिक कारागीर आदी समाजातील सर्वच घटकांना मध योजनेचा लाभ देण्यात येतो. मध योजनेअंतर्गत लाभ घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना विनाशुल्क निवासी प्रशिक्षण देण्याची व्यवस्था मंडळामार्फत करण्यात येते.
याशिवाय मंडळामार्फत पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम व मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना आदी योजना राबविण्यात येतात. या योजनेअंतर्गत उद्योजकांना विविध उद्योग उभारण्यासाठी अर्थसहाय्य तसेच अनुदानाचा लाभ देण्यात येतो.
या शिबीरामध्ये कृषी विभाग, वन विभाग, पंचायत समिती आदी कार्यालयांचा सहभागी होणार आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, २४ ब, जुना पुणे मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरी समोर, पुणे-३ (दु.क्र ०२०-२५८११८५९) येथे संपर्क साधावा.
शिबीरात निःशुल्क प्रवेश असून अधिकाधिक नागरिकांनी नाव नोंदणी करावी तसेच शिबीरात सहभागी होऊन मंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी केले आहे.
000