पुणे : बहु असोत सुंदर संपन्न…इये मराठीचीये नगरी…हे हिंदू शक्ती आणि म्यानातून उसळे… यांसारख्या अजरामर झालेल्या गीतांमधून व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील चित्तथरारक प्रसंगांच्या अंगावर रोमांच आणणा-या कथारूपी वर्णनातून शिवछत्रपतींची शौर्यगाथा पुणेकरांसमोर उलगडली. भारतीय कला वैभव तर्फे ‘अमर आग’ या गीत, पोवाडे आणि ऐतिहासिक प्रसंग वर्णन कार्यक्रमाद्वारे शिवरायांच्या कार्याचा गौरव अनोख्या पद्धतीने करण्यात आला.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे शिवजयंती निमित्त आयोजित शिवमहोत्सव कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरासमोरील जय गणेश प्रांगण येथे सुरु आहे. सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, अमोल चव्हाण, सचिन आखाडे, तुषार रायकर यांसह मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या महोत्सवाचे आयोजन केले आहे.
अमर आग कार्यक्रमात स्वराज्य तोरण…जय देव जय देव जय जय शिवराया… चैतन्याची थाप… या वीररसयुक्त गीतांचे सादरीकरण झाले. तर, शिवछत्रपतींच्या जन्मापासून ते शिवराज्याभिषेकापर्यंत महत्वाचे प्रसंग कथारूपात व चित्रफितीच्या माध्यमातून देखील पुणेकरांसमोर दाखविण्यात आले. सागरा प्राण…अनादी मी… शत जन्म… मेरा रंग दे बसंती… जयोस्तुते… या देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य, स्वातंत्रसैनिकांनी मिळविलेले स्वातंत्र्य आणि आजची परिस्थिती याबद्दल देखील सुरेख मांडणी कार्यक्रमाचे प्रमुख मंदार परळीकर यांनी केली.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी शिवव्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान झाले. ते म्हणाले, स्वराज्याचा विस्तार करीत आक्रमकांना विरोध करताना देखील छत्रपती शिवाजी महाराज विविध विषयावर चर्चा करीत ज्ञानवृद्धी, साहित्य वृद्धी करीत होते. त्यांनी स्वराज्य साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या देखील उंचीवर नेऊन ठेवले. कोमजलेली मने घडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरच्या काळात तसा प्रयत्न कोणी केला नाही आणि मने घडविणारी तंत्रे अस्तित्वात नसल्याने आपण पारतंत्र्यात गेलो.
* सोमवारी (दि. १९) सकाळी १० वाजता शिवजन्माचा पाळणा
मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण म्हणाले, शिवजयंतीच्या दिवशी सोमवार, दिनांक १९ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता मुख्य शिवजन्मोत्सव सोहळा होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात महिला सहभागी होणार असून शिवजन्माचा पाळणा देखील होईल. सोमवारी सायंकाळी मयूर थिएटर्स निर्मित नितीन सूर्याजीराव मोरे प्रस्तुत शिवराज्याभिषेक सोहळा हे ५० कलाकारांसहित भव्य नाटक होणार आहे. पुणेकरांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.


