आसाममधील कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणणारे, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर यांच्या उपस्थित होणार महोत्सवाचे उद्घाटन
आरोग्य विषयक तब्बल ३१ लघुपट व माहितीपट पाहण्याची संधी
पुणे, दि. ५ डिसेंबर, २०२५ : पुण्यातील पी. एम. शाह फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी आयोजित करण्यात येणारा आरोग्य चित्रपट महोत्सव यावर्षी शुक्रवार दि. १२ आणि शनिवार दि. १३ डिसेंबर रोजी विधी महाविद्यालय रस्त्यावरील एनएफडीसी – राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे संपन्न होणार असल्याची घोषणा पी. एम. शाह फाऊंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी यांनी केली. महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून देशविदेशातून आलेल्या १४५ हून अधिक लघुपट व माहितीपटांमधून ३१ निवडक लघुपट व माहितीपट महोत्सवादरम्यान दाखविले जातील असेही अॅड. चेतन गांधी यांनी नमूद केले. सदर आरोग्य चित्रपट महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर त्यासाठी प्रवेश देण्यात येईल, असेही आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.
१४ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन शुक्रवार दि. १२ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता आसाममधील कर्करोगाच्या उपचारात क्रांती घडवून आणणारे, आसाममधील कचार कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरचे संचालक असलेले, रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते, पद्मश्री डॉ. रवी कन्नन आर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. यानंतर दुपारी ३ वाजल्यापासून लघुपट व माहितीपट दाखविण्यात येतील. दुसऱ्या दिवशी (शनिवार दि. १३ डिसेंबर) सकाळी १० वाजल्यापासून इच्छुकांना लघुपट व माहितीपट पाहता येतील आणि त्यानंतर सायं ४ वाजता महोत्सवाचा समारोप होईल. यावेळी सुप्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांच्या हस्ते समारोप व विजेत्यांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होईल. यावेळी सर्वोत्कृष्ट लघुपट आणि माहितीपटांना पुरस्कार देण्यात येतील.
महोत्सवाविषयी अधिक माहिती देताना अॅड. चेतन गांधी म्हणाले, “दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पी. एम. शाह फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही १४ व्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन करीत असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील आम्हाला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावर्षी देशविदेशातून तब्बल १४५ पेक्षा जास्त लघुपट व माहितीपटांनी आपला सहभाग महोत्सवासाठी नोंदविला असून यापैकी निवडक ३१ लघुपट व माहितीपट पाहण्याची संधी उपस्थितांना मिळणार आहे. यामध्ये मानसिक आरोग्य, लहान मुलांचे आरोग्य व बाललैंगिक शोषण, महिला आरोग्याचे प्रश्न, अवयवदान, कर्करोग, सामाजिक आरोग्य, स्वच्छता, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विषयक समस्या आदी विषयांचा समावेश आहे हे विशेष.”
भारतासोबतच जगभरातून दुबई, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका, पाकिस्तान, अल्जेरिया, इंग्लंड, बांग्लादेश, सेनेगल, फिलिपिन्स, फ्रान्स, ओमान, सौदी अरेबिया, मेक्सिको, साउथ आफ्रिका, सेरेबिया आणि इराण या देशांतून महोत्सवासाठी प्रवेशिका आल्या असून या सर्व माहितीपट व लघुपटांच्या निवड प्रक्रियेचे काम प्रख्यात समीक्षक, आणि सामाजिक कार्यकर्त्या अनुजा देवधर, डॉ लीना बोरुडे व सामाजिक कार्यकर्त्या नीता मेहता यांनी केले आहे. महोत्सवात दाखविण्यात येणारे लघुपट, माहितीपट हे विविध भाषांमधील असले तरीही त्यासाठी इंग्रजी सबटायटल्स असतील अशी माहितीही अॅड. गांधी यां
नी दिली.


