प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांचे मत
पुणे ऑब्स्टट्रिक अँड गायनालॉजिकल सोसायटीकडून प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित
पुणे, दि. १५ डिसेंबर, २०२५ : देशामध्ये मधुमेहाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे, त्यामुळे मुलींच्या आरोग्याकडे लहानपणापासूनच अधिक काटेकोरपणे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ. चित्तरंजन याज्ञिक यांनी व्यक्त केले.
पुणे ऑब्स्टट्रिक अँड गायनालॉजिकल सोसायटीतर्फे हॉटेल शेरटन ग्रँड येथे आयोजित करण्यात आलेल्या ३४ व्या वार्षिक परिषदेदरम्यान प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. सविता मेहंदळे, अभिनेता ओम भुतकर, सोसायटीचे अध्यक्ष डॉ. मनीष माचवे, उपाध्यक्षा डॉ. वैशाली चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शहरातील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय गुप्ते यांचा पुणे ऑब्स्टट्रिक अँड गायनालॉजिकल सोसायटीकडून जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. स्त्रीरोग क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टरांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
मधुमेहाच्या वाढत्या धोक्याचा विचार केला तर आपण मुलींच्या आरोग्याकडे अधिक प्रमाणात लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मधुमेह हा काही प्रमाणात अनुवांशिक असला तरी अलीकडच्या काळात त्यामध्ये बदल होत आहेत. जीवनशैलीमध्ये होणाऱ्या बदलामुळे मधुमेहाचे स्वरूप बदलत चालले आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या मंडळींनी या समस्येकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असल्याचे डॉ. याज्ञिक यावेळी म्हणाले.
तरुण डॉकटर मंडळीनी शिकावे आणि मोठे यश मिळवावे असा, सल्ला डॉ. संजय गुप्ते यांनी यावेळी दिला. मधुमेहाच्या वाढत्या समस्येचा विचार करता मुलींच्या आरोग्याची काळजी घेणे ही जबाबदारी आहे. आपण आतापर्यंत जे काम करत आलो त्यामध्ये माझे शिक्षक, सहकारी यांचा वाटा मोलाचा राहिलेला आहे. भविष्यकाळात देखील आपण अधिक चांगले काम करण्याचा प्रयत्न करत राहू, असे डॉ. गुप्ते यावेळी म्हणाले.
आपल्याला डॉक्टरी पेशाबद्दल कायम आदर राहिला असून समाजासाठी ही मंडळी मोठे काम करत असल्याचे अभिनेते ओम भुतकर यावेळी म्हणाले. डॉक्टरांच्या परिषदेमधून नवीन विषय पुढे येत असतात. अभिनयाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींसाठी देखील तशा परिषदा होण्याची आवश्यकता असल्याचे भूतकर यांनी नमूद केले.


