Monday, August 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedसमाजात चित्रपट माध्यमाचे महत्व सर्वाधिक; प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांचे मत

समाजात चित्रपट माध्यमाचे महत्व सर्वाधिक; प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांचे मत

पुणे, दि. १७ डिसेंबर, २०२५ : समाजातील तळागाळापर्यंत कोणताही विषय पोहचवण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे होते, त्यामुळे या माध्यमाचे महत्व सर्वाधिक असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री रेणुका दफ्तरदार यांनी व्यक्त केले. पी. एम. शहा फाऊंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौदाव्या आरोग्य चित्रपट महोत्सवाचा समारोप रेणुका दफ्तरदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला त्यावेळी दफ्तरदार बोलत होते. पी. एम. शहा फाऊंडेशनचे संचालक अॅड. चेतन गांधी यावेळी उपस्थित होते. विधी महाविद्यालय रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय येथे नुकताच हा दोन दिवसीय १४ वा आरोग्य चित्रपट महोत्सव संपन्न झाला. या महोत्सवामध्ये तब्बल ३१ लघुपट पाहण्याची संधी उपस्थितांना मिळाली.

 

यावेळी बोलताना रेणुका दफ्तरदार म्हणाल्या, “चित्रपटाच्या माध्यमातून समाजामध्ये चांगल्या प्रकारे जनजागृती होत असून ते एक प्रभावी माध्यम आहे. आरोग्याचा कठीण विषय चित्रपटाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवणे हे कठीण काम आहे. मात्र, ते या महोत्सवाच्या माध्यमातून झाले आहे.” मुलांवर चित्रपटाचा परिणाम पटकन होतो, याचे उदाहरण देताना त्यांनी मुलांपर्यंत जहिरातीच्या माध्यमातून काही गोष्टी अगदी सहजपणे पोहचत असतात, यावरूनच हे माध्यम किती प्रभावी आहे, हे स्पष्ट होते असे दफ्तरदार यांनी सांगितले. आरोग्य हा विषय सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, त्यामुळे समाजातील तळागाळापर्यंत त्याच्याशी निगडित असणारे विषय चित्रपटाच्या माध्यमातून सहजपणे पोहचू शकतात, असेही दफ्तरदार यांनी नमूद केले.

 

कोरोनाच्या काळात सगळीकडे भयानक स्थिती होती, त्यावेळी रुग्णालयात असणाऱ्या मंडळींना ‘भाडिपा’ या युट्युब वरील व्यासपीठावरून वेगवेगळे भाग सादर करत त्यांना आधार देण्याचे काम केले. त्याचा आजही विचार केला तर हे माध्यम रुग्णांना आधार देण्यासाठी किती बलशाली ठरले याचे प्रत्यंतर येते. आरोग्य चित्रपट महोत्सवाचे आयोजन राज्यामध्ये सर्वत्र होण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

 

आरोग्याच्या विषयावर तयार करण्यात आलेले चित्रपट या माध्यमातून समाजापर्यंत पोहचवण्याचे महत्वाचे काम करताना त्यामध्ये तरुण मंडळींचा सहभाग चांगला होता. देशभरातून आलेल्या १५० चित्रपटांपैकी ३१ चित्रपट निवडून ते इथे दाखवण्यात आल्याचे अॅड. चेतन गांधी यांनी यावेळी सांगितले.

 

महोत्सवातील लघुपट विभागात ‘मिसिंग’ या चित्रपटाने पहिला, ‘लाइफ आफ्टर लॉस’ या लघुपटाने दुसरा तर ‘आनंदी’ या लघुपटाने तिसरा क्रमांक पटकावला. तर माहितीपट विभागात ‘वेनम वॉरियर’ने पहिला, ‘मंगलाचार’ या माहितीपटाने दुसरा तर ‘व्ही. के. एम स्पेशल स्कूल’ या माहितीपटाने तिसरा क्रमांक पटकावला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनिका जोशी यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments