Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजर्मन भाषेसाठी झटणाऱ्या निर्मळ मनाच्या प्राध्यापकाचे मिस्कील अनुभव कथन ‌‘बिकट वाट परि...

जर्मन भाषेसाठी झटणाऱ्या निर्मळ मनाच्या प्राध्यापकाचे मिस्कील अनुभव कथन ‌‘बिकट वाट परि वाट‌’ या प्रा. दिलीप राजगुरुंच्या कादंबरीला मिळाली विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त दाद

पुणे, दि 28 डिसेंबर २०२५ : गेली पाच दशके जर्मन भाषा शिकवणाऱ्या प्रा. दिलीप राजगुरू या विद्यार्थीप्रीय प्राध्यापकाची आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणजे त्यांचे निरलस व निखळ मनाने कौतुक करणाऱ्या भाषेसाठी झटणाऱ्या प्राध्यापकाचे अनुभव कथन आहे. त्यांचा कादंबरी नायक असणाऱ्या हसतमुख सुहासचा जर्मन भाषेबरोबरचा हा रोमान्स असून त्यात प्रा. राजगुरुंची मिस्कील वृत्ती व काव्यात्मकता या दोन्हींचा प्रत्यय येतो, असे या कादंबरीवर भरभरून बोलणाऱ्या विद्यार्थ्यानी सांगितले. तीन वर्षांपूर्वी प्रा. राजगुरू यांनी ‌‘आउस देस लेबन आयनेस इंडिशेन टाउगनिषत्स‌’चे (फ्रॉम अ लाईफ ऑफ ॲन इंडियन गुड फॉर नथिंग) ही आत्मचरित्रात्मक कादंबरी जर्मन भाषेत लिहिली होती.

 

प्रा. राजगुरुंच्या ‌‘बिकट वाट परि वाट..‌’ या मराठी कादंबरीचे प्रकाशन त्यांच्या विद्यार्थिनी असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील जर्मन भाषा विभाग प्रमुख प्रा. डॉ. स्वाती आचार्य, जर्मन प्राध्यापक व ‌‘केल्याने भाषांतर‌’ या नियतकालिकाच्या संपादक प्रा. डॉ. सुनंदा महाजन, नात मिशिता दुवा आणि अमलताश बुक्सचे सुश्रुत कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. या प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन आकाशवाणीच्या प्रसिद्ध निवेदक मृदुला घोडके यांनी केले. मेधा राजगुरू यांनी प्रास्तविक तर मयुरी दुवा यांनी आभार प्रदर्शन केले.

 

यावेळी प्रकाश गाडगीळ, शिल्पा साळवे, सविता केळकर, राजन पटवर्धन, धनश्री देशपांडे, वैशाली दाबक दाबके, ज्योती राजगुरू, चंदू काळे, दिलीप केळकर, सुधीर पित्रे, प्रा. उल्हास बापट आणि प्रा. सुधीर फडके यांनी प्रा. राजगुरू यांच्याबद्दलची मनोगते सादर केली. तसेच या सोहळ्याला प्रा. राजगुरू यांचे असंख्य विद्याथी-विद्यार्थिनी, स्नेही व आप्तेष्ट उपस्थित होते.

 

डॉ. महाजन म्हणाल्या की, ही कादंबरी म्हणजे प्रा. राजगुरुंचे प्रांजळ आत्मकथन असून त्यातील नायक हा अनेक नोकऱ्यांतून व परीस्थितीला तोंड देत पुढे जर्मन भाषा शिकवणारा विद्यार्थीप्रीय प्राध्यापक बनतो. महाविद्यालयात शिकवताना विद्यार्थ्यांना जीव लावणाऱ्या या प्राध्यापकाला विद्यार्थ्यांनीही जीव लावला. आमच्या किशोरवयात प्रा. राजगुरुंनी शिकवलेले ‌‘हसत-खेळत‌’ जर्मन भाषेचे तास आमच्या कायमचे स्मरणात राहिले आहेत. परकीय भाषा कशी शिकवायची याचे ते चालते-बोलते उदाहरण आहेत.

 

राजगुरू सरांनी आम्हाला जर्मन भाषेचे वेड व व्यसन लावले. शब्द हे जिवंत वस्तू असून ती खेळवण्याची किमया असणारे ते किमयागार आहेत. विद्यार्थीकेंद्री अध्यापनात निरलस व निखळ मनाने कौतुक करणारा हा प्राध्यापक म्हणजे त्यांचा कादंबरी नायक असणारा हसतमुख सुहास आहे. विनोदबुद्धीमुळे जन्मजात ‌‘कोट्याधीश‌’ असणाऱ्या राजगुरू सरांनी आम्हाला खूप काही दिले, अशी कृतज्ञता डॉ. आचार्य यांनी व्यक्त केली.

 

एका सामान्य मुलाच्या आयुष्याला अचानक वेगळं वळण मिळतं, आणि त्याचं जग कसं बदलून जातं याचा मिस्कीलपणे वेध घेणारी ही आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे. ही कादंबरी म्हणजे आपल्याला नव्या संस्कृतींची दारं खुली करून देत आपल्या आकलनक्षमतेचा विस्तार करते, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

 

राजगुरू सरांची ही आत्मचरित्रात्मक कादंबरी म्हणजे जर्मन भाषेबरोबरचा रोमान्स असून ही त्या भाषेबरोबरची त्यांची प्रेम कहाणीच आहे. त्याचा नर्मविनोद व काव्यात्मकता या दोन्हींचा प्रत्यय या लेखनात ठायी ठायी येतो, असे प्रा. राजगुरुंचे विद्यार्थी व पत्रकार विवेक सबनीस यांनी सांगितले.

 

मॅक्सम्युलर भवन व ग्योथं इन्स्टिट्यूटप्रमाणेच महाराष्ट्रात प्रथमच ‌‘टीईएलसी‌’ (द युरोपियन लँग्वेज सर्टीफिकेशन) सारखी जर्मन भाषा शिकवणारी संस्था पुण्यात सुरू करण्याचे श्रेय राजगुरु सरांना जाते. तेंडुलकराच्या ‌‘पण आमच्यावर प्रेम कोण करते‌’ या कथेचे त्यांनी त्याचे जर्मन भाषेत नाट्यरूपांतर करून त्याचे प्रयोग कले याचे मोल मोठे आहेे, असे प्रा. राजगुरुंचे विद्यार्थी धनेश जोशी यांनी सांगितले.

 

प्रा. दिलीप राजगुरू म्हणाले की, ही कादंबरी आपण प्रथम जर्मन भाषेत लिहिली असून त्याचे भारतातील जर्मन ॲम्बेसेडर तसेच जर्मन कौन्सिलेट जनरल यांनी विशेष कौतुक केले होते. नवीन भाषा शिकल्यामुळे जगाकडे पाहण्याचा उदात्त दृष्टिकोन मिळतो. तसेच त्या भाषेतील कला, साहित्य व संस्कृतीचा खजीना आपल्या हाती येतो. सध्याच्या जागतिक व राष्ट्रीय स्तरावर भाषाविषयी गोंधळ सुरू असून संकुचित वृत्ती सोडून एकमेकांच्या भाषा शिकण्याने ती बदलू शकेल, याचीही चर्चा या पुस्तकात केली आहे.

 

आपल्या आवडींची, क्षमतांची ओळख उशीराने झालेला, तोवर इतरांच्या आणि स्वत:च्याही नजरेत निरुपयोगी ठरलेला सुहास स्वत:ची बलस्थानं सापडल्यावर त्याच्यातील बदल तितकेच आश्चर्यकारक होते. त्याच्या आगळ्यावेगळ्या जगायच्या पद्धतीमुळे त्याचा वैशिष्ट्यपूर्ण जीवन प्रवास आणि भाषाप्रवास या कादंबरीतून बघायला मिळतो, असे प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ व अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी प्रतिक्रिया दे

ताना सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments