पुणे, 16 जानेवारी 2026: सायकलिंग स्पर्धेतील ४३२ कि.मी. अंतराच्या नव्या शर्यतीत सहभागी होताना आवश्यक असलेल्या कौशल्य आणि शारीरिक कसोटीचा अनुभव घेण्यासाठी भारतीय सायकलपटू सज्ज झाले आहेत. भारतात प्रथमच होणाऱ्या या सर्वाधिक अंतराच्या शर्यतीला आंतरराष्ट्रीय सायकलिंग महासंघाकडून २.२ मानांकन दर्जा मिळाला असून, यासाठी भारताने १२ सायकलपटूंचा सर्वात मोठा संघ निवडला आहे.
मायदेशी होत असलेल्या या स्पर्धेत भारतीय सायकलपटूंच्या दोन संघांमध्ये विभागल्या जाणाऱ्या या पथकाला पूर्वतयारी आणि अपेक्षा अशा दोन्ही आव्हानांना तोंड द्यावा लागणार आहे. यानिमित्ताने झालेल्या पत्रकार परिषदेत भारताचा राष्ट्रीय सायकलिंग संघ आणि भारतीय क्रीडा विकास संघ यातील सदस्यांनी पत्रकारांशी आज संवाद साधला. यावेळी भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव मनिंदरपाल सिंग यांच्यासह भारतीय सायकलिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅक्सत अयाजबायेव्ह आणि सहप्रशिक्षक जोगिंदर सिंग उपस्थित होते. त्यांच्यासह राष्ट्रीय संघातील सदस्य हर्षवीर सिंग सेखोन, विश्वजीत सिंग, सूर्य थत्तू आणि भारतीय विकास संघातील सदस्य अक्षर त्यागी, मानव सारडा हेही यावेळी उपस्थित होते.
19 ते 23 जानेवारी 2026 या पाच दिवस चालणाऱ्या या शर्यतीत विशेष करून भारतीय सायकलपटूंसाठी या स्पर्धेच्या कामगिरीच्या जोरावर ऑलिंपिक पात्रतेकरता बहुमोल गुणांची कमाई करण्याची संधी असणार आहे.
यावेळी भारतीय सायकलिंग महासंघाचे महासचिव मनिंदरपाल सिंग म्हणाले की, भारतीय सायकलिंग क्षेत्रासाठी बजाज पुणे ग्रँड टूर हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. विविध टप्प्यांमध्ये चालणाऱ्या युसीआय 2.2 स्पर्धेचे यजमानपद मिळवणे सोपे नव्हते. मात्र, भारतीय सायकलिंग महासंघाने गेल्या अनेक वर्षांपासून केलेल्या अथक प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्हाला मिळणारी विश्वासार्हता याबाबतीत निर्णय ठरली. या स्पर्धेमुळे भारतीय सायकलपटूंसाठी ऑलिम्पिकचे दरवाजे उघडणार आहेत. सायकलिंग या खेळाकडे शासन प्रायोजक आणि गुंतवणूकदार कशाप्रकारे पाहतात हे सुद्धा सिद्ध होणार आहे. या शर्यतीच्या आयोजनामुळे संघटनेला आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धेचे यजमानपद कशाप्रकारे निभवावे याचे धडेच मिळणार आहे
भारतीय सायकलिंग संघाचे मुख्य प्रशिक्षक मॅक्सत अयाजबायेव्ह म्हणाले की, अशा भव्य दर्जाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करणे भारतीय सायकलिंग क्षेत्रासाठीच नव्हे तर भारतीय सायकलपटूंसाठी सुद्धा अत्यंत मोलाचे ठरणार आहे. बजाज पुणे ग्रँड टूरमुळे आमच्या सायकल पटूना मायदेशातील ट्रॅकवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा आनंद मिळणार आहे. या स्पर्धेचा संपूर्ण रूट तयार करणे तसेच स्पर्धेत संपूर्ण आयोजन आणि त्यासाठीची पूर्वतयारी हा संपूर्ण भाग अतिशय प्रभावीपणे पार पडण्यात आला आहे. स्पर्धेसाठी आमची पूर्वतयारी सुद्धा उत्तम झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय सायकलपटू नक्कीच चांगली कामगिरी करतील, असा मला विश्वास वाटतो.
भारतीय राष्ट्रीय संघाचा हर्षवीर सेखोन म्हणाला, ‘स्वता:च्या देशात खेळणे हे मी दडपण म्हणून पाहत नाही, तर ती माझ्यासाठी एक प्रेरणा आहे. आपल्या मायदेशातील रस्त्यांवर आणि आपल्याच लोकांसमोर खेळल्याने मला ऊर्जा मिळते. भारतातील इतक्या मोठ्या स्तरावरील शर्यतीचा हा माझा पहिलाच अनुभव आहे आणि ‘बजाज पुणे ग्रँड टूर’चा भाग असल्याचा मला अभिमान वाटतो. आमची तयारी जोरदार झाली असून, आम्ही उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.’
या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करताना भारतीय राष्ट्रीय संघाचा सूर्या थत्तू म्हणाला, ‘भारतीय सायकलिंगसाठी हा एक मोठा आनंदाचा क्षण आहे. पुणे ग्रँड टूरसारख्या शर्यती आम्ही आजवर फक्त टीव्हीवर पाहायचो. आता भारतात आणि विशेषतः माझ्या राज्यात इतक्या मोठ्या शर्यतीत सहभागी होणे खूप खास आहे. युरोपमध्ये शर्यतीत भाग घेणे आव्हानात्मक असते; कारण तिथे खेळाडूंना सर्व व्यवस्था स्वतःच करावी लागते. मात्र, पुणे ग्रँड टूरचा अनुभव वेगळा आहे. येथे आमच्या तयारीच्या प्रत्येक पैलूची उत्तम काळजी घेतली गेली आहे. यामुळे आमचे मनोबल वाढले असून, आम्हाला आता फक्त शर्यतीवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. बेल्जियमसारख्या देशांप्रमाणे भारतातही अशा नियमित शर्यती झाल्या, तर तरुण खेळाडूंना खऱ्या संधी उपलब्ध होतील.’
पुण्यातील व्यवस्थेबद्दल बोलताना भारतीय मुख्य संघातील सदस्य विश्वजित सिंग म्हणाला, ‘जेव्हा आम्ही पुण्यात आलो आणि मार्गांची पाहणी केली, तेव्हा इथल्या रस्त्यांचा दर्जा आणि एकूणच आयोजन खरोखरच प्रभावी वाटले. संघांना देण्यात येणारे सहकार्य, वाहने, इतर पायाभूत सुविधा या मोठ्या आंतरराष्ट्रीय शर्यतीच्या तोडीच्या आहेत. भारतात असा अनुभव येणे खास आहे आणि यामुळेच आम्हाला आमचे सर्वोत्तम देण्याची प्रेरणा मिळते.’
भारतीय राष्ट्रीय विकास संघाचा सदस्य मानव सारडा म्हणाला, ‘या शर्यतीत भारतीय राष्ट्रीय संघ आणि विकास संघ दोन्ही एकत्र असणे ही आमच्यासारख्या तरुण खेळाडूंसाठी मोठी संधी आहे. वरिष्ठ खेळाडूंसोबत सराव करणे आणि भारतात अशा मोठ्या शर्यतीत सहभागी झाल्याने आमच्या कामगिरीत मोठी सुधारणा होईल.’
अक्षर त्यागी पुढे म्हणाला, ‘वरिष्ठ खेळाडूंसोबतच्या सराव शिबिरामुळे आम्हाला आमच्या शर्यतीतील लहान; पण महत्त्वाच्या त्रुटी सुधारण्यास मदत झाली. या अनुभवामुळे आमच्यात आत्मविश्वास निर्माण झाला आहे, की आम्ही प्रथम आमच्या वरिष्ठांशी स्पर्धा करू शकतो आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आव्हान देऊ शकतो. येथे आम्हाला मिळणारे सहकार्य हे मोठ्या आंतरराष्ट्रीय शर्यतींसारखेच आहे आणि या विश्वासामुळे खूप मोठा फरक पडतो.’


