देवतेचा माघी उत्सव सोमवारपासून
श्री देवदेवेश्वर संस्थान, सारसबाग : सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी यांची उपस्थिती
पुणे : श्री देवदेवेश्वर संस्थान अंतर्गत सारसबाग मंदिरातील श्री सिद्धिविनायक देवतेचा वार्षिक महोत्सव सोमवार, दिनांक १९ जानेवारी ते शनिवार, दिनांक २४ जानेवारी या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात श्रीमंत नानासाहेब पेशवे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.यंदाचा पुरस्कार चेन्नईचे महामहोपाध्याय आर. मणि द्राविड शास्त्री आणि तिरुपतीचे डॉ. कुटुंब शास्त्री यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार शुक्रवार, दिनांक २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाहक व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुरेश ऊर्फ भैय्याजी जोशी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त रमेश भागवत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी संस्थानचे विश्वस्त सुधीर पंडित, पुष्कर पेशवा, जगन्नाथ लडकत, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. सोमवार, दिनांक १९ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्री ब्रम्हणस्पती सूक्त पठण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता सुहास हिरेमठ यांचे ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ : आक्षेप आणि वास्तव’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री ८ वाजता व्हायोलिन वादक राजस उपाध्ये आणि संतूर वादक निनाद दैठणकर यांचा व्हायोलिन–संतूर जुगलबंदीचा कार्यक्रम होणार आहे.
मंगळवार, दिनांक २० जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महिलांचे सामुदायिक श्रीसूक्त पठण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. गुरुदास नुलकर यांचे ‘निसर्ग संवर्धन आणि स्व-सुरक्षा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री ८ वाजता सीए ऋषिकेश बडवे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.
बुधवार, दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता सामुदायिक अथर्वशीर्ष पठण होणार आहे. सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार मुकुंद संगोराम यांचे ‘ज्योतीने तेजाची आरती’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री ८ वाजता वृषाली मावलंकर व सहकाऱ्यांचे सुगम व भक्तिसंगीताचे कार्यक्रम होणार आहेत.
गुरुवार, दिनांक २२ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता गणेशयाग होणार आहे. सायंकाळी ६ वाजता डॉ. अंजली पर्वते यांचे ‘प्राचीन भारतातील तेजस्वी स्त्रिया’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. रात्री ८ वाजता राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन होईल. शनिवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता वारकरी संप्रदायाचे कीर्तन होणार आहे. हे सर्व कार्यक्रम सारसबागेच्या श्री सिद्धिविनायक मंदिराच्या प्रांगणात हो
णार आहेत.


