पुणे, १७ ऑक्टोबर :
मानसिक आजारांचे वाढते आव्हान, कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास आणि वाढता मूलतत्त्ववाद यामुळे जगभरात संघर्षाचे सावट पसरले आहे. अशा वेळी सकल सृष्टीच्या कल्याणाचा ध्यास घेणारे हिंदू तत्त्वज्ञानच विश्वाला योग्य दिशा दाखवू शकते, असे मत ज्येष्ठ विचारवंत आणि विविध संस्कृतींचे अभ्यासक डॉ. रविकुमार अय्यर यांनी शनिवारी पुण्यात व्यक्त केले.
एरंडवणे येथील सेवाभवन येथे आयोजित ‘हिंदू संकल्पनेचे वैश्विक आकलन’ या विषयावरील व्याख्यानात डॉ. अय्यर बोलत होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी नुकत्याच केलेल्या पाश्चात्य देशांच्या दौऱ्यात सहअस्तित्व आणि विश्वकल्याणावर मौलिक चिंतन मांडले होते; त्यामागील वैचारिक पार्श्वभूमी डॉ. अय्यर यांनी आपल्या व्याख्यानातून विस्तृतपणे विशद केली.
या प्रसंगी ‘प्रज्ञा प्रवाह’चे अखिल भारतीय समिती सदस्य रघुनंदनजी, ‘विश्व संवाद केंद्र’चे अध्यक्ष अभय कुलकर्णी, ‘एकता’ मासिकाच्या संपादक रूपाली भूसारी आणि सुनिता प्रभूणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. रविकुमार अय्यर पुढे म्हणाले, “स्टीव्ह जॉब्सपासून ते लिसा मिलरपर्यंत पाश्चात्त्य जगातील अनेक दिग्गजांना हिंदू तत्त्वज्ञानाने नवी दिशा दिली आहे. ईश्वरप्राप्तीचे विविध मार्ग, स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीचे शास्त्र आणि सहअस्तित्वाचा वैश्विक स्वीकार म्हणजे हिंदू विचार होय. आज माहिती तंत्रज्ञानामुळे ज्ञान सहज उपलब्ध होत असल्याने लोक अधिक तार्किक विचार करत आहेत. नेहमीच शास्त्रार्थाला आणि विवेकनिष्ठेला प्राधान्य देणारे हिंदू तत्त्वज्ञान जगाला आकर्षित करत असून, डोळसपणे जगभरातील लोक हिंदुत्वाचा स्वीकार करत आहे. आता भारतीय म्हणून विश्वाला सहअस्तित्वाचा कृतीशील संदेश देण्याचे उत्तरदायित्व आपले आहे.”
– सरसंघचालकांचा विश्वकल्याणाचा संदेश :
सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अमेरिकेतील दौऱ्यादरम्यान विविध संप्रदायांचे विचारवंत, भारतीय वंशाचे नागरिक आणि संघ स्वयंसेवकांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी हिंदुत्वातील ‘सह-अस्तित्व’ आणि ‘विश्वकल्याण’ या संकल्पनांवर भर दिला. मानसिक आरोग्याची समस्या आणि कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास या जागतिक आव्हानांवर मात करण्यासाठी सर्व पंथांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले. परदेशात आपत्तीच्या वेळी तत्परतेने धावून जाण्यासोबतच तेथील सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रांत संघ स्वयंसेवक मोलाचे योगदान देत असल्याचा उल्लेखही या वेळी करण्यात आला.
‘प्रज्ञा प्रवाह’चे रघुनंदनजी यांनी, “हिंदू जीवनशैलीचा स्वीकार करण्यासाठी आवश्यक असणारा व्यवहार, विचार आणि समाजरचना आपण जोपासली पाहिजे,” असे विचार व्यक्त केले.
प्रस्ताविकात अजय महाजन म्हणाले, “धर्म, संस्कृती आणि भाषेतील विविधतेकडे संघर्षाच्या दृष्टीने न पाहता सहअस्तित्वाच्या भावनेने पाहिले पाहिजे. हिंदू विचार ही ‘वसुधैव कुटुंबकम्’ची मांडणी करणारी व्यापक वैश्विक दृष्टी आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुवर्णा धर्माधिकारी यांनी केले, तर रूपाली भूसारी यांनी आभार मानले.
————-


