पुणे: इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स अँड टेक्नॉलॉजी (ISST) चे संस्थापक संचालक डॉ. विपुल लुनावट यांना प्रतिष्ठित CII Sports Business Awards 2025 अंतर्गत ‘Jury Special Mention (University Sports Program / Course of the Year)’ या श्रेणीत सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार डॉ. लुनावट यांनी ISST च्या वतीने स्वीकारला.
कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (CII) यांच्या पुढाकारातून दिले जाणारे CII Sports Business Awards हे भारतातील क्रीडा व्यवसाय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, शैक्षणिक संस्थां, ब्रँड्स आणि व्यक्तींना गौरविण्यासाठी दिले जातात. सन 2025 हे या पुरस्कारांचे तिसरे वर्ष असून, हे पुरस्कार CII ScoreCard Conclave या प्रतिष्ठित राष्ट्रीय परिषदेसोबत प्रदान केले जातात. या परिषदेमध्ये क्रीडा धोरण, क्रीडा व्यवसाय आणि क्रीडा परिसंस्थेच्या विकासावर सखोल चर्चा होते.
हा सन्मान ISST च्या जागतिक दर्जाच्या क्रीडा शिक्षणासाठी असलेल्या दृढ बांधिलकीचे तसेच भारताच्या क्रीडा क्षेत्राचे भविष्य घडवणारे कुशल व्यावसायिक, तज्ज्ञ व नेतृत्व घडवण्याच्या प्रयत्नांचे प्रतीक आहे.
या पुरस्कार सोहळ्यात ISST ला भारतातील अनेक नामांकित क्रीडा संस्था व व्यक्तींसोबत गौरविण्यात आले. यामध्ये हरियाणा स्टीलर्स, शिव नरेश, द स्पोर्ट्स स्कूल – बेंगळुरू, शेरू आंग्रिश (संस्थापक – शेरू क्लासिक), सिद्धांत अग्रवाल (संस्थापक – स्पोर्टवोट), मनोज बडाले (लीड ओनर – राजस्थान रॉयल्स), प्रीती झंगियानी (संस्थापक – प्रो पंजा लीग), टाटा स्टील, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, पॅरालिम्पिक कमिटी ऑफ इंडिया आणि गोस्पोर्ट्स फाउंडेशन यांचा समावेश होता.
अशा प्रभावी आणि दूरदृष्टी असलेल्या संस्था व नेतृत्वाच्या पंक्तीत मिळालेला हा सन्मान ISST साठी क्रीडा शिक्षण अधिक सक्षम करण्यासाठी आणि भारताच्या क्रीडा परिसंस्थेच्या सर्वांगीण विकासात भरीव योगदान देण्यासाठी नवी प्रेरणा देणारा आहे.


