*
राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील हे नेहमीच आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखीचे आहेत. त्यांच्या साध्या राहणीमानाचा प्रत्यय आज कोथरुडकरांना आला. कोथरुड मधील किनारा हॉटेल येथील श्रमिकांसोबत नाश्त्याचा आनंद घेत संवाद साधला. यावेळी दादांचे हे रुप पाहून कोथरुडकरांनी देखील अतिशय समाधान व्यक्त केले.
भारतीय राजकारणात खूप मोजकेच नेते असे सापडतात ज्यांना खऱ्याअर्थाने लोकसेवा करण्याची इच्छा असते. मात्र राजकारणात अद्यापही काही नेते असे आहेत, ज्यांच्याकडे पाहून राजकीय क्षेत्राकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. हे राजकारणी अनेक वर्ष राजकारण करतात, निवडून येतात, लोकांची कामे करतात परंतु त्यांचं राहणीमान सर्वसामान्य जनतेप्रमाणेच असते.
महाराष्ट्राच्या राजकारणातील असे साधे राहणीमान असलेलं; पण उच्च विचारसरणी असलेलं व्यक्तिमत्त्व म्हणजे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील. चंद्रकांतदादा पाटील हे आपल्या साध्या राहणीमानामुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी ते शासकीय कामकाजाला विलंब नको; म्हणून रेल्वे स्टेशनवरील मालाच्या पोत्यांवर बसून फाईलींवर स्वाक्षरी करुन कामे मार्गी लावताना दिसतात. तर कधी चहाच्या टपरीवर सर्व सामान्यांप्रमाणे चहाचा आस्वाद घेताना पाहायला मिळतात.
आज ही त्यांच्या साध्या राहणीमानाचा कोथरुडकरांना प्रत्यय आला. कोथरुड मधील किनारा हॉटेल चौक येथे जमणाऱ्या श्रमिकांसाठी नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी प्रेमाची न्याहारी उपक्रम सुरू केला आहे. रोज सकाळी असंख्य श्रमिक बांधव या उपक्रमाचा लाभ घेत असतात. आज नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनीही श्रमिकांसोबत न्याहारीचा आस्वाद घेत संवाद साधला.
यावेळी बोलताना नामदार पाटील म्हणाले की, माझ्या गुरुंनी सेवा हाच खरा धर्म असल्याची शिकवण दिली आहे. त्यामुळे श्रमिक बांधवांसाठी प्रेमाची न्याहारी उपक्रम सुरू केला आहे. आगामी काळात श्रमिक बांधवांच्या उत्तम आरोग्यासाठी तपासणी केंद्र सुरु करण्याचा मानस आहे. त्यासोबतच पुणे आणि आसपासच्या भागात श्रमिक बांधवांसाठी तीर्थक्षेत्र दर्शन यात्रा सुरू करत आहे. यासोबत श्रमिक बांधवांना आपल्या विविध कामांसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता करता यावी; यासाठी मोफत ईसेवा केंद्र देखील कार्यान्वित केले जाईल, असे जाहीर केले.


