पुणे, दि. 21 – भारत हा विविध भाषांचा, संस्कृतींचा आणि परंपरांचा देश आहे. “कोसाकोसावर पाणी बदले, तीन कोसावर वाणी”, असं म्हणतात. प्रत्येक राज्याची भाषा, पोशाख, खाद्यसंस्कृती वेगळी असली, तरी “भारतीय” ही ओळख आपल्याला एकत्र बांधून ठेवते. या एकात्मतेला बळ देणारं एक महत्त्वाचं साधन म्हणजे अनुवाद. केवळ एका भाषेतील शब्द दुसर्या भाषेत मांडत भाषांतील अंतर दूर करणं म्हणजे अनुवाद नव्हे. तो दोन संस्कृतींमध्ये संवाद घडवणारा सेतू आहे. एका भाषेतील विचार, भावना, परंपरा आणि मूल्य दुसर्या भाषिक समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य अनुवाद करतो. त्यामुळे परस्पर समज, सहानुभूती आणि आदर निर्माण होतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ अनुवादक डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सुरु झालेल्या आठव्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरुन त्या बोलत होत्या. यावेळी संमेलनाचे स्वागताध्य्क्ष ज्येष्ठ अनुवादक डॉ. रवींद्र गुर्जर, महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर, ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रकांत शहासने व संयोजिका तेजाली शहासने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. “अनुवादातून राष्ट्रभक्ती” या संकल्पनेला वाहिलेले हे संमेलन फिरोदिया ऑडिटोरियम, फर्ग्युसन महाविद्यालय येथे सुरु आहे.
राष्ट्रनिर्मितीसाठी अनुवाद या विषयावर पुढे बोलतांना फडके म्हणाल्या की, आपल्या देशाप्रति निष्ठा व्यक्त करण्यासाठी जी प्रतिज्ञा सर्व शाळांमध्ये म्हटली जाते, ती तिथल्या राज्यभाषेनुरूप. भाषा बदलली तरी आशय बदलत नाही. राष्ट्रनिष्ठेची भावना तीव्रपणे जागृत होते आणि जागरूकतेने जोपासली जाते. ही प्रतिज्ञा जरी तेलुगु भाषेत लिहिली गेली असली, तरी तिचा अनुवाद मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती, बंगाली आणि पंजाबी या सहा भाषांत करण्यात आला. अवघ्या साठ-सत्तर शब्दांत राष्ट्र्प्रेम जागवण्याची ही किमया केवळ अनुवादाने साध्य झाली आणि त्यामुळेच “राष्ट्रजोडणी” हाच या वर्षीच्या “राष्ट्रभक्ती साहित्य संमेलना” चा प्रमुख विषय ठेवण्यात आला आहे,
आज संमेलनाच्या पहिल्या दिवशी अनुवादविषयक व्याख्यानांमध्ये डॉ. प्रांजली देशपांडे यांनी कृत्रिम बुध्दीमत्ता आणि अनुवाद, भारत प्रेस परिषदेचे अधिकारी हर्षल आकुडे यांनी प्रशासकीय सेवेतील अनुवादाच्या संधी, सुश्रुत कुलकर्णी यांनी क्रांतीकारक साधने तर दीपक झेमसे यांनी पेटंट व शास्त्रीय अनुवाद या विषयावर मार्गदर्शन केले. भाषासौष्ठव जपताना त्यातील अनुवादातील खाचाखोचा या विषयावर विदुला टोकेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
संमेलनाच्या दुसर्या दिवशी, रविवारी (22 फेब्रुवारी) मराठी भाषेच्या जतनासाठी आपले आयुष्य समर्पण करणार्या ज्येष्ठ मराठी व्याकरण तज्ञ प्रा. यास्मिन शेख यांना शिक्षणप्रेमी शांतारामशेठ शहासने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यवाह डॉ. अविनाश चाफेकर यांना कवयित्री उर्मिलाताई कराड जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच ओळख देशभक्तांची या उपक्रमाचा संकल्पपूर्ती समारंभ लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यावेळी मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे विवेक भोसले, पर्यावरणप्रेमी डॉ. स्वयंंप्रभादेवी मोहिते पाटील, मराठीकाका अनिल गोरे उपस्थित राहणार आहेत.
—————————-


