धायरी (प्रतिनिधी): देशाच्या उत्थानाचे कुटुंब हे मुलभूत युनिट आहे. आदर्श माता ही कुटुंबात संस्कारांचे बीजारोपण करते. अशा संस्कारीत कुटुंबातूनच राष्ट्र निर्माण होते, असे मत राष्ट्र सेविका समितीच्या नांदेड नगर प्रमुख डॉ. सुनिताताई जंगले यांनी व्यक्त केले.
चव्हाण बाग येथील हिंदू संमेलन समितीच्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त (गुरुवार, १९ मार्च) भव्य ‘हिंदू संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. ओमेगा हेरिटेजच्या मैदानावर पार पडलेल्या या सोहळ्याला धायरी परिसरातील ७५० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. संमेलनाची सुरुवात गणेश नक्षत्रम सोसायटी ते कार्यक्रम स्थळापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली. या शोभायात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे लहान मुलांच्या ढोल-ताशा पथकाचे सादरीकरण होते. त्यांच्या शिस्तबद्ध प्रात्यक्षिकांनी उपस्थितांना भारावून टाकले.
शरद गोडसे म्हणाले, ” राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शंभर वर्षांचा प्रवास हा केवळ एका संघटनेचा विस्तार नसून, तो समाजाला सोबत घेऊन जाण्याचा आणि राष्ट्रनिर्माणासाठी केलेल्या संघर्षाचा इतिहास आहे. डॉ. हेडगेवारांनी मांडलेला हाच विचार आज वस्तीपातळीपर्यंत पोहोचला आहे.”
श्री. पुरुषोत्तम महाराज कुलकर्णी यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्व आणि त्याचे आचरण यावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते ‘हिंदू जागरणाच्या १०० वर्षांची संघयात्रा’ या सांस्कृतिक वार्तापत्राच्या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाच्या ठिकाणी ‘भाविसा’ साहित्य विक्री स्टॉल आणि ‘गोसेवा’ उत्पादनांच्या स्टॉल्सनाही नागरिकांनी भेट दिली. या संमेलनाला आमदार श्री. भीमराव तापकीर, नगरसेविका धनश्रीताई कोल्हे, नगरसेवक श्री. सचिन मोरे, उद्योजक श्री. दत्ता कोल्हे आदींची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. केदारजी फडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री. राजेशजी डंख यांनी मानले.


