पुणे : प्रख्यात गायिका माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित ‘अमृताहूनी गोड’ या विशेष संगीत कार्यक्रमाने पुणेकर रसिकांना सुरेल पर्वणी अनुभवायला मिळाली. ‘या राधेला अडवू नको’, ‘खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी’, ‘जाळीमंदी पिकली करवंद’, ‘घननीळा लडीवाळा’, ‘दर्शन दे राधेला’, ‘हसले मनी चांदणे’ अशी एकापेक्षा एक सरस गीते सादर करीत कलाकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळ यांच्या वतीने गणपती मंदिराच्या ४३ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवात हा कार्यक्रम सादर करण्यात आला. गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या या महोत्सवात नू. म. वि. प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात विविध सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, माणिक वर्मा फाऊंडेशनच्या वतीने सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमाने महोत्सवात विशेष रंगत आणली. राणी वर्मा, वंदना गुप्ते, भारती आचरेकर, शैला दातार, सावनी दातार, नीलाक्षी पेंढारकर, दीपिका जोग, ह्र्दया दातार, अस्मिता पांडे यांनी सादरीकरणात सहभाग घेतला.
कार्यक्रमात माणिक वर्मा यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या संगीत प्रवासाचे भावपूर्ण चित्रण करण्यात आले. सावनी दातार यांनी ‘सनातन नाद हा साधुजना पहावे…’ आणि ‘तुझ्या मनात कुणीतरी लपला ग…’ या गीतांच्या सादरीकरणाने वातावरण भारावले. पंडित श्रीनिवास खळे यांच्या ‘एकतारी गाते गाते गीत विठ्ठलाचे’ या रचनेचे प्रभावी सादरीकरण झाले, तर किशोरी आमोणकर यांच्या ‘पीड पराई’ या गाजलेल्या बंदिशीच्या सादरीकरणाने रसिकांची दाद मिळवली.
दीपिका जोग यांनी ‘क्षणभर उघड नयन देवा’ आणि ‘विठ्ठला आळवीते मी तुला’ ही भक्तीगीते सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले. तसेच अभिनेत्री भारती आचरेकर यांनी ‘त्या सावळ्या तनूचे’ हे गीत सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता माणिक वर्मा यांनी अजरामर केलेल्या ‘सावळाच रंग तुझा’ या गीताने झाली आणि संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले.


