पुणे, २५ मार्च २०२६ : विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या शारदा शक्ति, पश्चिम महाराष्ट्र या संघटने तर्फे नुकतेच एरंडवणे येथील सेवाभवन मध्ये शक्ति स्थापना दिवस आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून ‘आयुष मंत्रालयाच्या मान्यताप्राप्त वैज्ञानिक’ डॉ.शर्मिला मांडे आणि प्रमुख अतिथी म्हणून कृषी संशोधक व भारतीय किसान संघ पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री पद्मश्री श्री.श्रीरंग तथा दादा लाड उपस्थित होते.यावेळी शक्तीच्या राष्ट्रीय महासचिव वैद्य लीना बावडेकर, शारदा शक्तीच्या अध्यक्ष डॉ.प्रियंवदा हेर्लेकर आणि सचिव मनिषा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
युनायटेड नेशन्स ने हे वर्ष महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केले आहे. म्हणून निघोज, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर येथील दुग्धव्यवसाय व शेती यात उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुण उद्योजिका सौ.श्रद्धा ढोरमले यांना ‘शक्ती प्रेरणा सन्मान’ पुरस्काराने गौरविण्यात आले.पुरस्कारार्थी श्रद्धा ढोरमले यांचे कष्ट, जिद्द आणि लहान वयातच अफाट कतृत्वाने उभा केलेला व्यवसाय यामुळे त्या “शक्ती प्रेरणा सन्मान” पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.पद्मश्री दादा लाड, डॉ. शर्मिला मांडे, वैद्य लीना बावडेकर यांच्या हस्ते श्रद्धा ढोरमले यांना मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच जावली, ता. फलटण सारख्या ग्रामीण भागातून आलेल्या व नीट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण होऊन स्वतःच्या हिमतीवर वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश घेते ही पण खूपच कौतुकास्पद गोष्ट आहे. बुलढाणा मेडिकल कॉलेज ला एमबीबीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या प्रगतशील विद्यार्थिनी ‘अर्पिता बोराटे’ हिला ‘स्व शक्ती सन्मान’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारार्थी सौ.श्रद्धा ढोरमले, अर्पिता बोराटे यांचे आई-वडील व शिक्षक यावेळी उपस्थित होते. अर्पिता बोराटे यांच्या वतीने तिच्या आईने ‘स्व शक्ती सन्मान’ स्वीकारला. यात रोख रक्कम व भेटवस्तू देऊन तिचे कौतुक करण्यात आले.अर्पिताचे मनोगत व्हिडिओद्वारे सादर केले गेले.
प्रास्ताविकात डॉ.प्रियंवदा हेर्लेकर यांनी शारदा शक्तीच्या या कार्यक्रमाचे औचित्य सांगितले आणि उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
वैद्य लीना बावडेकर यांनी राष्ट्रीय शक्ती या संस्थेचा परिचय तसेच वार्षिक अहवाल सादर केला. भारतीय ज्ञान परंपरा जतन आणि संवर्धन करण्यासाठी संमेलने, परिषदा, संवाद आणि व्याख्यानांच्या माध्यमातून महिलांना जागृत केले जाते. यामध्ये पौगंडावस्थेत प्रवेश करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन मुलींसाठी व त्यांच्या पालकांसाठी ‘युवाशक्ती अभियान’ , ग्रामीण महिलांसाठी ‘ग्रामपरि योजना’ ही उद्योजकता मार्गदर्शन कार्यशाळा, बचत गटातील महिलांसाठी आयुर्वेदीय औषधी निर्माण कार्यशाळा, मुलींमधील विज्ञान विषयक उत्सुकतेला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘विज्ञानातील महिला व मुली आंतरराष्ट्रीय दिवस’ हा उत्सव देशभर आयोजित केला जातो.
शारदा शक्ती, पश्चिम महाराष्ट्र या संस्थेतर्फे चालणारे विविध उपक्रम त्यांची माहिती सचिव मनिषा कुलकर्णी यांनी दिली. शाळा, कॉलेज यामध्ये जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञान-तंत्रज्ञान, आरोग्य, पर्यावरण यांचा जागर करण्यासाठी शारदा शक्ती कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
श्रद्धा ढोरमले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या व्यवसायातील बारीक-सारीक कौशल्य त्यांनी त्यांच्या वडिलांकडून शिकून घेऊन हा व्यवसाय पुढे चालवला. सुमारे 150 म्हशींचा दुमजली गोठा, दुग्ध व्यवसाय आणि दुग्धजन्य पदार्थ व अन्य बायोफर्टीलायझर्स,स्लरी, तसेच बायोगॅस निर्मिती आणि त्यावर वीज निर्मिती असा सर्व उद्योग सांभाळून सुमारे 40 जणांना त्यांनी रोजगार निर्मिती सुद्धा करून दिली आहे. निर्भेळ व सकस दूध निर्मितीसाठी त्या अथक परिश्रम करत असतात. या सर्वाची माहिती त्यांनी आपल्या मनोगतात दिली.
पद्मश्री दादा लाड म्हणाले की, कापूस तंत्रज्ञानामध्ये कमी अंतरावर सघन लागवड, गळ फांदी व्यवस्थापन, शेंडा खुडणे, संतुलित खत व्यवस्थापन यासारखी शास्त्रशुद्ध तंत्रज्ञान मी विकसित केली आहेत. लाड तंत्रज्ञान उर्फ कॅनोपी मॅनेजमेंट म्हणून हे नावारूपाला आले आहे. कोरडवाहू आणि कमी पाणी असलेल्या जमिनीसाठी हे एक वरदानच आहे. आपल्या या कामाची दखल घेऊन भारत सरकारने २०२६ मधील कृषी क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार बहाल केला आहे. माझ्या या तंत्रज्ञानाचा उपयोग महिला शेतकरी सुद्धा आवर्जून करत आहेत असेही दादांनी सांगितले. कृषी क्षेत्रात भारत हे विश्वाचे गोडाऊन आहे या शब्दात त्यांनी गौरव केला.
डॉ. शर्मिला मांडे यांनी त्यांच्या सध्याच्या संशोधनांबद्दल माहिती दिली.त्या म्हणाल्या की, मानवाच्या शरीरात त्याच्या शरीरात असलेल्या पेशींपेक्षा कित्येक पट जास्त प्रमाणात असलेल्या अनेक प्रकारच्या जीवाणूंचा (बॅक्टेरिया)समूह असतो. त्याला मायक्रोबायोमे ही संज्ञा वापरली जाते. सर्वसाधारणपणे जिवाणू हे रोगकारक असतात असा समज आहे. परंतु आपल्या शरीरात आणि शरीरावर (त्वचा) असलेल्या या जीवाणूंचा आपल्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम होत असतो असे अलीकडे झालेल्या संशोधनातून दिसून आले आहे. यावर जगभरात जे संशोधन होत आहे त्यातून जी माहिती उपलब्ध होत आहे त्याचे विश्लेषण (डेटा ॲनालिसिस) करण्याचे काम डॉ. शर्मिला मांडे करत आहेत. याचा उपयोग आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकीय शास्त्रातील रोग उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जात आहे असेही त्यांनी सांगितले.
आभार प्रदर्शन आणि सूत्रसंचालन डॉ. मनीषा खळदकर यांनी केले.
शारदा शक्ती पश्चिम महाराष्ट्र या संस्थेच्या सर्व कार्यकर्त्या भगिनी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बहुमोल सहकार्य केले.कार्यक्रमासाठी विविध संस्था व महाविद्यालयांचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे, पश्चिम महाराष्ट्र येथे २००६ मध्ये ‘ शक्तिचे’ कार्य ‘शारदा शक्ति’ नावाने सुरू झाले. महिला सबलीकरणसाठी विज्ञान, तंत्रज्ञान, पर्यावरण, शाश्वत विकास, महिला आरोग्य,शिक्षण या विषयांच्या अंतर्गत शक्तीच्या उपक्रमांची आखणी केली जाते.


