पिंपरी, दि. २५ मार्च २०२६ : पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचा विचार करून सादर करण्यात आलेला सर्वसमावेशक अर्थसंकल्प निश्चितच दूरदृष्टीपूर्ण आहे. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आणि शहराच्या शाश्वत विकासाला चालना देणारा हा अर्थसंकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त करीत महापौर रवि लांडगे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सुधारित अर्थसंकल्प २०२६-२७ हा उपसूचनांसह मंजूर केला.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची अर्थसंकल्पीय विशेष सभा पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात महापौर रवि लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ते बोलत होते.
सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विधी समिती सभापती सुजाता बोराटे, महिला व बालकल्याण समिती सभापती राणी पठारे, शहर सुधारणा समिती सभापती संजय नाना काटे, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिक्षण समिती सभापती रविना आंगोळकर तसेच नगरसदस्य, नगरसदस्या आणि महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अर्थसंकल्पीय विशेष सभेत सुरुवातीला स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी अर्थसंकल्प २०२६-२७ सादर केला. त्यानंतर या अर्थसंकल्पावर सविस्तर चर्चा सभेत झाली.
या अर्थसंकल्पावर बोलताना महापौर रवि लांडगे म्हणाले, शहरासमोरील सर्वात गंभीर आणि महत्त्वाचा प्रश्न असलेल्या पाणीपुरवठ्यासाठी या अर्थसंकल्पात सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे, ही अत्यंत सकारात्मक बाब आहे. शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत अजित पवार यांचे कार्य अमूल्य असून, त्यांच्या स्मरणार्थ ‘अजित सृष्टी’ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पुण्याच्या धर्तीवर पिंपरी चिंचवडमध्ये ‘कलाकार कट्टा’ उभारण्यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिवंगत लोकनेते लक्ष्मण जगताप यांच्या नावाने आरोग्य सेवा हेल्पलाईन व मदतकक्ष उभारण्याचा घेण्यात आलेला निर्णयही नागरिकांच्या हिताचा ठरेल. शहरातील भटक्या श्वानांच्या समस्येच्या निवारणासाठी ६ कोटी रुपयांचा निधी ठेवण्यात आला आहे. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करून वीजबिलात बचत करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. कामगारांसाठी ‘कामगार कट्टा’ उभारण्यासाठी ४ कोटी, स्टॉर्म वॉटर लाईनसाठी ५ कोटी आणि हॉकर्स झोनसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे देखील महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.
पर्यावरणपूरक शहर घडविण्याच्या दृष्टीने ‘ऑक्सिजन पार्क’ तसेच शहरातील २०३ उद्यानांचे हरितीकरण करण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित आहे. प्रत्येक नगरसेवकाला १० लाखांचा स्वतंत्र निधी देण्याचा निर्णय स्थानिक विकासकामांना गती देणारा ठरेल. यासोबतच, पवना नदीप्रमाणेच इंद्रायणी नदीसाठीही रिव्हरफ्रंट विकासाची तरतूद करण्यात यावी, माता रमाई स्मारकाच्या धर्तीवर महात्मा फुले स्मारकासाठीही निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच शहरात प्रभावी क्रीडा धोरण राबविण्यासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात यावी, अशा उपसूचना देखील महापौर रवि लांडगे यांनी यावेळी मांडल्या.
महापौर रवि लांडगे म्हणाले, पिंपरी चिंचवड महापालिकेचा सुधारित अर्थसंकल्प २०२६-२७ हा सर्वसमावेशक असून तो मंजूर करत आहे. शहरातील विकासकामांच्या निधीच्या बाबतीत कोणतीही अडचण आली तर राज्य व केंद्र शासनाकडून आवश्यक ते सहकार्य घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. यासोबतच स्वच्छ, पारदर्शक आणि गतिमान प्रशासन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक त्या सुधारणा नवनियुक्त आयुक्तांशी चर्चा करून करण्यात येतील. तसेच महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यावर विशेष भर देत पाणी, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण, क्रीडा, कला आणि स्थापत्य या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करण्यात येईल.
तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासाचा सखोल विचार करून स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सादर केलेला सुधारित अर्थसंकल्प २०२६-२७ हा अत्यंत अभ्यासपूर्ण, संतुलित आणि दूरदृष्टी ठेवणारा आहे. शहरातील पाणीपुरवठा, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत त्यांनी केलेली तरतूद निश्चितच कौतुकास्पद आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला हा अर्थसंकल्प शहराच्या शाश्वत आणि गतिमान विकासाला दिशा देणारा ठरेल, असे मत देखील महापौर रवि लांडगे यांनी व्यक्त केले.
…अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही – आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पीय विशेष सभेत महापालिकेचे पदाधिकारी, नगरसदस्य यांच्याकडून प्राप्त झालेल्या सूचनांबाबत आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी म्हणाले, महापालिका सभेत लोकप्रतिनिधींद्वारे शहराच्या विविध प्रश्नांची आणि गरजांची सखोल माहिती मिळाली. शहरातील प्रत्येक नागरिकाची अपेक्षा स्वच्छ, तत्पर आणि पारदर्शक प्रशासनाची आहे आणि ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासन कटिबद्ध आहे. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी चांगल्या हेतूने काम करत असताना काही त्रुटी राहिल्यास त्या निश्चितपणे समजून घेतल्या जातील. मात्र जाणीवपूर्वक चुकीच्या हेतूने काम किंवा टाळाटाळ करणाऱ्या कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची अजिबात गय केली जाणार नाही. अशा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असेही त्यांनी सभेत सांगितले.
याशिवाय येणाऱ्या काळात शहरासमोर पाणीपुरवठ्याचा प्रश्नावर लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविण्यावर भर दिला जाईल. तसेच अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे आणि इतर नागरी समस्या यांवर सर्वांच्या समन्वयातून प्रभावीपणे काम करून योग्य तोडगा काढण्यात येईल. तसेच प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या एकत्रित प्रयत्नांतून शहराचा शाश्वत, नियोजित आणि नागरीकेंद्रित विकास साध्य करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू, असे देखील आयुक्त डॉ. वि
जय सूर्यवंशी म्हणाले.


