Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedभांडारकर संस्थेच्या वतीने प्राचीन कृषी पध्दतीचा अभ्यासक्रम विकसित* शेतकऱ्यांना मिळणार प्राचीन...

भांडारकर संस्थेच्या वतीने प्राचीन कृषी पध्दतीचा अभ्यासक्रम विकसित* शेतकऱ्यांना मिळणार प्राचीन शेतीविषयक धडे

 

 

पुणे, दि. २१ मे – प्राचीन काळापासून आपल्या देशातील विविध भागांमध्ये, विविध राज्यांमध्ये असलेले जमिनीचे प्रकार आणि तेथील हवामान यानुसार होत असलेली शेती, शेतीचे प्रयोग याची शास्त्रशुध्द माहिती आजच्या शेतकऱ्यांना व्हावी या उद्देशाने भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेने कृषी पध्दतीचा अभ्यासक्रम विकसित केला असल्याची माहिती भांडारकर संस्थेचे कार्याध्यक्ष भूपाल पटवर्धन आणि नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी आज येथे दिली.

पर्यावरणपूरक शेती, शेतीची कामे, मातीची पोत कशी सुधारावी यासारखी शेतकऱ्यांना माहिती व्हावी व तसेच प्राचीन भारतातील कृषी पद्धत कशी होती या विषयाची शेतकऱ्यांना माहिती मिळावी व या पद्धतीने कृषी पध्दतीचा अभ्यासक्रम भांडारकर संस्थेच्या वतीने विकसित करण्यात आला आहे. यासाठी नांदेडच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त सहकार्याने प्राचीन भारतातील कृषी पद्धतीवर असलेला हा अभ्यासक्रम शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. यासाठी कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. यावेळी चव्हाण म्हणाले की, प्राचीन भारतीय शेतीचा अभ्यास आजपर्यंत लोकांपर्यंत पोहचलेला नाही, या पद्धतीच्या अभ्यासक्रमानुसार तळागाळातील लोकांना त्याची चांगली माहिती मिळू शकेल. अशा प्रकारचा देशातील हा पहिलाच अभ्यासक्रम असून शेतकऱ्यांना एक नवीन संधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे. दोन्ही संस्थामधील त्यासंबंधीचा सामंजस्य करार नांदेड येथे नुकताच करण्यात आला. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष नरेंद्र चव्हाण, संचालक व्यंकटराव कल्याणकर, कार्यकारी संचालक महेंद्र घोलप, वित्त व्यवस्थापक निलेश गाढे, सरव्यवस्थापक गजानन सबनीस तसेच भांडारकर संस्थेचे मनोज एरंडे, चिन्मय भांडारी आदी उपस्थित होते.

याबरोबरच स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि भांडारकर संस्थेमध्ये देखील एक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन, संचालक डॉ. शैलेश वढेर आणि अधिष्ठाता एम. के. पाटील उपस्थित होते. या करारानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासन नीती, मोडी लिपी, भारतीय ज्ञान परंपरा यासंबंधीचे विविध विषय विद्यापीठाच्या संबंधित विभागांमधील विद्यार्थ्यांना भांडारकर संस्थेद्वारे ऑनलाईन पध्दतीने शिकवण्यात येणार आहेत, अशीही माहिती एरंडे यांनी यावेळी दिली. भांडारकर संस्थेतर्फे विविध विषयांचे ऑनलाईन अभ्यासक्रम सातत्याने सुरु असून अभ्यासकांनी संस्थेच्या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन चिन्मय भांडारी यांनी केले आहे.

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments