Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedवीरांचे वीर धर्मवीर’ मधून उलगडला शंभूराजांच्या शौर्यगाथेचा थरारक आविष्कार*

वीरांचे वीर धर्मवीर’ मधून उलगडला शंभूराजांच्या शौर्यगाथेचा थरारक आविष्कार*

 

विवेक व्यासपीठ आयोजित ‘वीरांचे वीर धर्मवीर’ हा अभिनव कार्यक्रम ; दृकश्राव्य माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनपटाचे अभिवाचन, चलचित्र, ॲनिमेशन आणि संगीताच्या माध्यमातून सादरीकरण

 

पुणे : पुरंदरच्या तहानंतरचा संघर्ष, स्वराज्यरक्षणासाठीच्या अखंड मोहिमा, औरंगजेबासमोर न झुकलेली जाज्वल्य भूमिका आणि धर्मासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान… असा छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील तेजस्वी क्षणांचा प्रवास ‘वीरांचे वीर धर्मवीर’ या दृकश्राव्य प्रयोगातून जिवंत झाला. शंभूराजांच्या जन्मापासून अमरत्वापर्यंतचा शंभूचरित्राचा हा प्रवास पडद्यासह अमोघ वाणीतून अनुभवताना उपस्थित पुणेकर इतिहासाच्या त्या सुवर्ण पण वेदनादायी पर्वाशी एकरूप झाले.

 

विवेक व्यासपीठ आयोजित ‘वीरांचे वीर धर्मवीर’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन एस. पी. कॉलेजमधील लेडी रमाबाई हॉल येथे करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर मंजुषा दीपक नागपुरे, ह.भ.प. संग्राम भंडारे, दिपक नागपुरे, शि.प्र.मंडळी नियामक मंडळाचे अध्यक्ष सुधीर काळकर, तुषार कुलकर्णी, महेश पवळे, यशोधन भिडे, वर्षा भोळे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची संकल्पना, लेखन आणि सादरीकरण नीलेश रमेश भिसे यांचे असून, त्यांनी संभाजी महाराजांचे जीवन, त्यांचे कार्य, लेखन, विविध मोहिमा आणि युद्धनीती यांचे प्रभावी सादरीकरण करण्यात केले. यावेळी अभिवाचन, चलचित्र, ॲनिमेशन, संगीत आणि प्रकाशयोजनेच्या माध्यमातून इतिहासातील विविध प्रसंग जिवंत केले.

 

मंजुषा नागपूरे म्हणाल्या, आजची तरुणपिढी ही आभासी माध्यमांच्या विळख्यात अडकत आहे. अशा वेळी या आभासी माध्यमाचाच वापर करून तरुणांसमोर आपला जाज्वल्य इतिहास मांडला जात आहे, हे कौतुकास्पद आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास केवळ युद्धातील पराक्रमांपरुता मर्यादीत नव्हता तर त्यांच्या अनेक पैलू होते. ते या कार्यक्रमात मांडले आहेत. इतिहास केवळ वाचून नाही, तर तो अनुभवातून जगला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

 

नीलेश भिसे म्हणाले, पराक्रमाची तलवार, विद्वत्तेचे तेज आणि धर्मरक्षणासाठीचे सर्वोच्च बलिदान यांचा संगम असलेल्या छत्रपती संभाजी महाराजांचा जीवनप्रवास ‘वीरांचे वीर धर्मवीर’ या दृकश्राव्य प्रयोगातून साकारला. या चित्तथरारक दृकश्राव्य प्रयोगाने उपस्थितांना केवळ इतिहास दाखवला नाही, तर शंभूराजांच्या त्यागाची अनुभूतीही दिली, असेही त्यांनी सांगितले.

ज्ञानदा भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments