पुणे, दि. ४ जून २०२६ : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) पीएच.डी. (विद्यावाचस्पती) संशोधन केंद्रातर्फे गेल्या १३ वर्षांमध्ये वास्तूरचनाशास्त्रातील (आर्किटेक्चर) २५ संशोधकांना मार्गदर्शन करून त्यांना पीएच.डी. पदवी मिळवून देण्याचा रौप्यमहोत्सवी टप्पा पूर्ण केला आहे! वास्तूरचना क्षेत्रातील हा एक अभिमानास्पद उच्चांक असून या सर्व डॉक्टरेट पदवीधारकांच्या समावेत एका वैशिष्ट्यपूर्ण स्नेहमेळाव्यात त्यावर आधारित तयार करण्यात आलेल्या दस्तावेजाचे प्रकाशनही करण्यात येणार आहे.
५ जून २०२६ रोजी ‘जागतिक पर्यावरण दिना’चे औचित्य साधून कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण केंद्राच्या आवारातील आयएसडीएस सभागृहात सकाळी ११ वाजता हे सर्व पदवीधारक, त्यांचे मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ आणि अन्य संशोधक यांच्या उपस्थितीत विशेष स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. रावसाहेब लटपटे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत ‘संशोधन संहितेच्या सारांशाच्या एकत्रित संग्रह’ असलेल्या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
‘बीएनसीए’मध्ये २०१२ मध्ये स्थापन झालेल्या पीएच. डी. संशोधन केंद्र हे वास्तूरचनाशास्त्र विषयातील पहिले आणि अग्रगण्य संशोधन केंद्र असून ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न काम करत आहे. बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांच्या नेतृत्त्वाखाली सुरू झालेल्या या केंद्रामध्ये पीएच. डी. संशोधन व संशोधन मार्गदर्शनाचा पाया प्रा. डॉ. वसुधा गोखले आणि प्रा. डॉ. अभिजित नातू यांनी घातला आहे. या केंद्राच्या समन्वयक व संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. मीरा शिरोळकर ते काम करत आहेत. सध्या या केंद्रात सहा मान्यता पात्र संशोधक मार्गदर्शक कार्यरत असून वीस संशोधक त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. साठी संशोधन करत आहेत.
‘विशेष म्हणजे आजवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वास्तूरचनाशास्त्र विषयातील एकंदर ३० डॉक्टरेट पदव्यांपैकी २५ पदव्या ह्या एकट्या बीएनसीएतील पीएच.डी. संशोधन केंद्रातील मार्गदर्शनातून पूर्ण करण्यात आल्या आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे’, असे बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी सांगितले. ते म्हणाले की, या निमित्त तयार करण्यात येणारा २५ डॉक्टरेट मिळालेल्यांच्या शोधनिबंधांचा सारांश पुस्तकरूपात प्रसिद्ध होणार आहे. तो वास्तूरचना क्षेत्रातील अकादमिक क्षेत्रासाठी व व्यावसायिकांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल.
डॉ. वसुधा गोखले म्हणाल्या की, या सोहळ्याद्वारे बीएनसीए पीएच.डी. संशोधन केंद्रातील डॉक्टरेट पदवीधारकांचा गौरव, संशोधन मार्गदर्शकांचा सन्मान आणि वास्तूरचनाशास्त्रातील संशोधन संस्कृती अधिक बळकट करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
डॉ. मीरा शिरोळकर म्हणाल्या की, २५ शोधनिबंधाच्या या पुस्तकात बीएनसीए संशोधन केंद्रातून पूर्ण झालेल्या पीएच.डी. संशोधनाच्या सारांशाचा समावेश असून ते केंद्राने आजवर केलेल्या योगदानाचे ते दस्तावेजीकरण ठरेल. यातील प्रत्येकाचा शोधनिबंध हा ‘शोधगंगा’ या मायाजालावर उप
लब्ध आहे.


