यवतमाळ : Educated Illiterates (Personal Finance Management Your Money, Your Future) ह्या पुस्तकात वैयक्तिक पैशाचे व्यवस्थापन कशा प्रकारे करावे, याविषयी दिशा निर्देशन करण्यात आले आहे, नितीन श्रीवास्तव (9922945599) पुस्तकाचे लेखक असून, ते रेमंड कंपनीत कार्य निदेशक आहेत. त्यांचा ह्या क्षेत्रात दीर्घ अनुभव आहे. आपल्या मिळकतीचे कशाप्रकारे व्यवस्थापन केल्यास तुमचे वर्तमान आणि भविष्यकाळ सुखावह होईल हे शहाणपण एक कौशल्य आहे ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही शिक्षित असाल तरी त्या दृष्टिने अज्ञानीच आहात, हा मोलाचा संदेश ह्यात लेखकाने दिला आहे.
तुमची मिळकत आणि दैनंदिन होणारा खर्च यांचा ताळमेळ घालणे जरूरी असते. रोजच्या आवश्यक गरजांवर खर्च करताना देखील उधळपट्टी होणार नाही हे पाहावे. ह्या बाबींवर पैसा खर्च होताना झालेली बचत गुंतवून खर्चित पैसा पुन:प्राप्त करण्यासाठी बँकेत नियत कालावधीची गुंतवणूक, रोखे किंवा स्थावर मालमत्तेत गुंतवणूक इ. मार्ग सुचविले आहेत. ह्यातून मिळणारा पैसा भविष्यातील आजार, मुलांचे शिक्षण, लग्न इत्यादींसाठी उपयोगी ठरतो. लेखकाने खर्चाचे नियोजन, विमा, आयकर, निवृत्त झाल्यावर कमी होणारे उत्पन्न भरून काढणे इ. वरही प्रकाश टाकला आहे. आयकरातून जास्तीत जास्त सुट कशी मिळविता येईल यावरही मार्गदर्शन केले आहे. तसेच SIP (Systematic Investment Plan), IRR (Internal Rate of Return) अशा अनेक वित्तीय संकल्पनांशी वाचकाला अवगत केले आहे. लेखकाने तुमच्यात असणारी वित्तीय साक्षरतेची उणीव दूर करण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. पुस्तक डिजीटल स्वरूपातही उपलब्ध आहे. ह्या पुस्तकाची हिंदी आवृत्ती लवकरच उपलब्ध होत आहे. तज्ज्ञांचे अभिप्राय खाली देत आहे.
– शब्दांकन
रणजित चंदेल, माहिती अधिकारी ( निवृत्त ) यवतमाळ
नितीन के. श्रीवास्तव यांचे ‘Educated Illiterates – Personal Finance Management Your Money, Your Future’ हे पुस्तक वैयक्तिक वित्त व्यवस्थापन आणि आर्थिक साक्षरतेच्या क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण योगदान आहे. दीर्घकालीन आर्थिक सुरक्षितता प्राप्त करण्यासाठी प्रभावी आर्थिक नियोजन, बचत आणि गुंतवणूक यांचे महत्त्व हे ते स्पष्ट करते. माहितीपूर्ण आर्थिक निर्णय, संपत्ती निर्मिती आणि जोखीम व्यवस्थापनात कशा प्रकारे योगदान देतात. यावर ह्यात Aप्रकाश टाकण्यात आला आहे. लेखकाने व्यावहारिक आर्थिक संकल्पना सरळ, आकलनीय आणि सोप्या पध्दतीने मांडल्या आहेत. लेखकाच्या मते, “केवळ सुशिक्षित असणे पुरेसे नाही, तर आर्थिकदृष्ट्या साक्षर असणेही आवश्यक आहे.” आपली आर्थिक साक्षरता वाढवून सुरक्षित आर्थिक भविष्य घडवायचे आहे, अशा वाचकांसाठी हे पुस्तक एक उत्कृष्ट मार्गदर्शक आहे.
– प्राध्यापक डॉ नंदकुमार मेटे,
विभाग प्रमुख ( अर्थशास्त्र)
अमोलकचंद महाविद्यालय,यवतमाळ
Educated Illiterates – Personal Finance Management Your Money, Your Future वैयक्तिक वित्त व्यवस्थापन तुमचा पैसा, तुमचे भविष्य
नुकतेच माझ्या वाचण्यात श्री. नितीन श्रीवास्तव लिखित ‘एज्युकेटेड इल्लिटरेट्स’ हे पुस्तक आले. पुस्तकाचे शीर्षक वाचूनच वाचक आकृष्ट होऊन त्यांची उत्सुकता वाढीस लागेल असा विश्वास वाटतो. ‘आर्थिक संकल्पनाचे सखोल ज्ञान असणे हे आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक आहे’, असा संदेश लेखकाने दिला आहे. आपल्या सर्वांना हवे असलेले आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आर्थिक साक्षरता महत्त्वाची आहे. ह्याकरिता प्रियजनांसह कोणावरही अवलंबून राहिल्यास अनेक अडचणींशी सामना करावा लागू शकतो. लेखकाने व्यावहारिक उदाहरणांव्दारे उत्तम गुंतवणूक कशी करावी आणि सेवानिवृत्तीसाठी प्रभावीपणे बचत कशी करावी, हे दाखवून दिले आहे. आर्थिक साक्षरता आपल्या तसेच अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी देखील आवश्यक आहे. हा महत्त्वाचा संदेश लेखकाने ह्या पुस्तकात दिला आहे.
– डॉ. विनायक श्रीधर देशपांडे
कुलगुरू, जी.एच. रायसोनी विद्यापीठ, अमरावती
नितीन श्रीवास्तव यांनी Educated Illiterates ह्या पुस्तकात वित्तीय व्यवस्थापनाविषयी दिलेली माहिती सामान्य माणसाला दैनंदिन जीवनात अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. पुस्तक सरळ आणि सोप्या भाषेत आहे. लेखकाचा हा उपक्रम अभिनंदनीय आहे.
– डॉ. सुनील अग्रवाल,
एम.डी. संजीवन हॉस्पिटल, यवतमाळ
श्री.रणजितसिंह चंदेल, यवतमाळ ९४२२८६६९३१


