पुण्यधाम आश्रमात श्री विठ्ठल भक्त वारकरी संप्रदायाच्या पंढरपूरच्या पवित्र वारीनिमित्त चार दिवस भक्तिमय, उत्साही आणि आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले. दरवर्षीप्रमाणे पंढरपूरकडे प्रस्थान करताना वारकरी मंडळींनी पुण्यधाम आश्रमात मुक्काम केला.
परंपरेनुसार वारकऱ्यांचे आगमन ९ जुलै रोजी होऊन ११ जुलैला पंढरपूरकडे प्रस्थान होणार होते. मात्र आळंदी येथे आलेल्या पुराच्या परिस्थितीमुळे ते नियोजित वेळेपूर्वी, म्हणजेच ७ जुलै रोजी पुण्यधाम आश्रमात दाखल झाले आणि ११ जुलैच्या सकाळपर्यंत आश्रमात मुक्कामी होते.
या संपूर्ण मुक्कामाचे प्रेमपूर्वक नियोजन श्री. भरतशेठजी धर्मावत व परिवार तसेच पुण्यधाम आश्रम परिवार यांनी केले. या चार दिवसांत आश्रम परिसर “जय जय रामकृष्ण हरी” च्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने, हरिनाम संकीर्तनाने, भजनांनी आणि वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त भक्तिरसपूर्ण नृत्यांनी दुमदुमून गेला. संपूर्ण वातावरण भक्ती, आनंद आणि चैतन्याने भारावून गेले होते.
पुण्यधाम आश्रमाच्या अध्यक्षा मा. कृष्णा, पद्मभूषण डॉ. विजय भटकर, पुण्यधाम आश्रमाचे अध्यक्ष सीए श्री. सदानंद शेट्टी, आश्रमाचे विश्वस्त, डॉ. परुळेकर तसेच श्री. भरतशेठजी धर्मावत व परिवार यांनी वारकऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले. त्यांच्या मुक्कामादरम्यान निवास, भोजन आणि इतर सर्व आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली.
या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी ६०० हून अधिक वारकरी, भाविक आणि अभ्यागतांनी आश्रमाला भेट दिली. पंढरपूरच्या पुढील प्रवासासाठी रवाना होताना वारकऱ्यांना सेवाभावाचे प्रतीक म्हणून सोलापुरी चादरी, महिला वारकऱ्यांसाठी साड्या, उपवास चिवडा, शेंगदाणा लाडूंची पाकिटे आणि टॉवेल प्रेमपूर्वक भेट देण्यात आले.
पुण्यधाम आश्रमातील हे चार दिवस म्हणजे भक्ती, सेवा, प्रेम, समर्पण आणि एकात्मतेचा सुंदर संगम होता. वारकरी परंपरेतील सेवा आणि भक्तीचा संदेश सर्वांच्या मनात अधिक दृढ करणारा हा अविस्मरणीय आध्यात्मिक सोहळा ठरला.


