Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedपावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर...

पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका; पालकांनी विशेष खबरदारी घेण्याता तज्ज्ञांचा सल्ला

पुणे : पावसाळा सुरू होताच मुलांमध्ये युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI) म्हणजेच मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. पावसात भिजल्यानंतर दीर्घकाळ ओले कपडे घालून राहणे, ओले बूट वापरणे, जननेंद्रियांची स्वच्छता न राखणे, पुरेसे पाणी न पिणे आणि लघवी जास्त वेळ रोखून धरणे या सवयींमुळे विशेषतः 3 ते 13 वर्षे वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये UTI होण्याचा धोका वाढतो.

पुण्यातील 7 वर्षीय ‘राहा’ (नाव बदलले आहे) या मुलीला लघवी करताना जळजळ होणे आणि वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होऊ लागली. सुरुवातीला तिच्या पालकांनी ही लक्षणं किरकोळ आहेत असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर तिला ताप आणि पोटदुखी सुरू झाल्याने तिला उपचारासाठी तज्ज्ञांकडे नेण्यात आले. तपासणीनंतर तिला युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (UTI)चे निदान झाले. शाळेतून घरी परतल्यानंतर पावसात भिजलेले कपडे ती बराच वेळ बदलत नव्हती आणि शाळेत वारंवार शौचालयात जावे लागू नये म्हणून पाणीही कमी पित होती असे निदर्शनास आले. योग्य अँटिबायोटिक्सचा डोस, पुरेसे पाणी पिणे आणि स्वच्छतेची पुरेपुर काळजी घेतल्यानंतर ती आता पूर्णपणे बरी झाली आहे.

मदरहूड हॉस्पिटल, खराडी, पुणे येथील वरिष्ठ नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ डॉ. तुषार पारिख म्हणाले, मूत्रमार्गात जिवाणू (बॅक्टेरिया) प्रवेश करून त्यांची वाढ झाल्यास युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन (युटीआय संसर्ग) होतो. याचा परिणाम मूत्राशय, मूत्रमार्ग आणि काही वेळा किडनीवरही होऊ शकतो. पावसाळ्यात मुले बराच वेळ ओले कपडे किंवा ओल्या अंतर्वस्त्रांमध्ये राहतात. अनेकदा वैयक्तिक स्वच्छतेकडे दुर्लक्ष करतात, पुरेसे पाणी पित नाहीत किंवा लघवी बराच वेळ रोखून धरतात. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो. दर आठवड्याला माझ्याकडे 3 ते 4 मुले लघवी करताना जळजळ होणे, वेदना होणे, वारंवार लघवीला जावे लागणे, ताप, पोटदुखी, अंथरुण ओले करणे, उलट्या होणे आणि थकवा जाणवणे यासारखी लक्षणे घेऊन उपचारांसाठी दाखल होत आहेत. युटीआय संसर्गावर योग्य वेळी अँटिबायोटिक्स, पुरेसे पाणी पिणे आणि स्वच्छतेच्या सवयींमुळे यशस्वी उपचार करता येतात. मात्र ताप जास्त असणे, शरीरात पाण्याची कमतरता किंवा किडनीपर्यंत संसर्ग पोहोचल्यास रुग्णालयात दाखल करून उपचार करावे लागू शकतात.

डॉ. पारिख पुढे सांगतात की, वेळीच उपचार न केल्यास मुलांमधील युटीआय संसर्ग हा किडनीपर्यंत पसरू शकतो. त्यामुळे किडनीला संसर्ग (पायलोनेफ्रायटिस) होऊन दीर्घकालीन आणि काही वेळा भरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे त्वरित बदलावेत. दिवसभर पुरेसे पाणी पिण्याची सवय लावावी. शौचालयाचा वापर केल्यानंतर योग्य प्रकारे स्वच्छता आणि हात धुण्याची सवय लावणे गरजेचे आहे. लघवी जास्त वेळ रोखून ठेवू नये. जननेंद्रियांचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवावा तसेच मुलांना स्वच्छ, सुती आणि सैल कपडे घालावेत. योग्य स्वच्छता, पुरेसे पाणी आणि वेळीच वैद्यकीय उपचारांनी मुलांना वेदनादायक युटीआय संसर्गापासून सुरक्षित ठेवता येऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments