Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorized'ही पौर्णिमा स्वरांची'मध्ये अजरामर गीतांनी जागविल्या सांगीतिक स्मृती ...

‘ही पौर्णिमा स्वरांची’मध्ये अजरामर गीतांनी जागविल्या सांगीतिक स्मृती हिंदू महासभा आयोजित आणि स्वच्छंद पुणे प्रस्तुत कार्यक्रमात रसिकांनी अनुभवली अजरामर गीतांची अविस्मरणीय मैफल

 

 

पुणे : काही गीते काळाच्या प्रवाहातही जुनी होत नाहीत; प्रत्येक सादरीकरणातून ती नव्याने अनुभवता येतात. स्वरांच्या सुमधुर मैफिलीतून अशाच अजरामर गीतांचा सुवर्णकाळ ‘ही पौर्णिमा स्वरांची’ या कार्यक्रमात पुन्हा एकदा रसिकांसमोर उभा राहिला. गणेश वंदनेपासून जयोस्तुते श्री महान मंगलेपर्यंतच्या एकापेक्षा एक सरस सादरीकरणातून रसिकांच्या सांगीतिक स्मृतींना उजाळा यावेळी मिळाला.

 

हिंदू महासभा आयोजित आणि स्वच्छंद पुणे प्रस्तुत या कार्यक्रमात हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले , किशोर भक्त गायक मकरंद पाटणकर, विद्या घटवाई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाची सुरुवात ‘वंदितो तुजला गजवदना’ या गणेश वंदनेने झाली. त्यानंतर प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेले ‘गुरूने दिला ज्ञानरूपी वसा… आम्ही चालवू हा पुढे वारसा’… हे गुरुची महती सांगणारे गीत सादर करून गुरूंना स्वरांजली अर्पण करण्यात आली.

 

गुरुमहिमा सांगणाऱ्या गीतांनंतर वीररसाने ओतप्रोत भरलेले ‘हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी’ हे गीत रवींद्र शाळू आणि पल्लवी आनदेव यांनी प्रभावी शैलीत सादर केले. त्यानंतर एस. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले अभिमान चित्रपटातील ‘अब तो है तुमसे हर खुशी अपनी’ हे गीत प्रीती पेठकर यांनी सादर केले. अंजाना चित्रपटातील ‘रिमझिम के गीत सावन गाए’ हे युगुलगीत प्रीती पेठकर आणि संजय कांबळे यांनी सादर करताच रसिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद देत ‘वन्स मोअर’ची मागणी केली.

 

आनंद चित्रपटातील ‘ना जिया लागे ना… तेरे बिना मेरा कहीं जिया लागे ना’ हे गीत पल्लवी आनदेव यांनी भावपूर्ण शैलीत सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर ‘चंद्र आहे साक्षीला’ आणि ‘रिमझिम गिरे सावन’ या गीतांनी पावसाळ्याच्या सरींची अनुभूती देत रसिकांना जुन्या आठवणींच्या विश्वात नेले. ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘शुक्रतारा’, ‘शारद सुंदर’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘गुलाबी आँखे’ आणि ‘वादा कर ले साजना’ या लोकप्रिय गीतांनी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.

 

कार्यक्रमात गायक रवींद्र शाळू, पल्लवी आनदेव, प्रीती पेठकर, संजय कांबळे यांच्यासह मकरंद पाटणकर यांनी सादरीकरण केले. तसेच अवघ्या दीड वर्षांच्या वयापासून महाराष्ट्रातील विविध किल्ले सर करणाऱ्या बालगिर्यारोहक राजवर्धिनी चव्हाण हिचा विशेष सत्कार कार्यक्रमात करण्यात आला.

 

शैलेश देशपांडे (सॅक्सोफोन व बासरी), असिफ इनामदार (ऑक्टोपॅड), रोहित जाधव (तबला-ढोलकी), नितीन कुलकर्णी (गिटार)यांनी सुरेल साथसंगत केली.

 

जयोस्तुते श्रीमहन्मंगले या गीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments