Friday, October 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedबारामतीत रविवारी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन स्वातंत्र्यसैनिक संघटनेतर्फे नागरिकांना मोठ्या संख्येने...

बारामतीत रविवारी क्रांती दिनानिमित्त हुतात्मा स्तंभाला अभिवादन स्वातंत्र्यसैनिक संघटनेतर्फे नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

बारामती, दि. ७ : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील ऐतिहासिक ‘चले जाव’ आंदोलनाच्या स्मृती जागवण्यासाठी बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेतर्फे रविवारी (दि. ९) क्रांती दिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त सकाळी ११ वाजता बारामती शहरातील हुतात्मा स्तंभ, वंदे मातरम् चौक (भिगवण चौक) येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सन १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी मुंबईतील गोवालिया टँक मैदानावरून ब्रिटिश सत्तेविरोधात ‘चले जाव’ अर्थात ‘भारत छोडो’चा नारा दिला. तसेच ‘करा किंवा मरा’चा संदेश देत देशवासीयांना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले. या आंदोलनानंतर ब्रिटिश सरकारने महात्मा गांधी यांच्यासह अनेक राष्ट्रीय नेत्यांना अटक करून देशभर धरपकड सुरू केली. या ऐतिहासिक आंदोलनाच्या स्मरणार्थ दरवर्षी ९ ऑगस्ट हा दिवस देशभर ‘क्रांती दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात १८५७ पासून अनेक क्रांतिकारकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीविरोधात संघर्ष केला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेच्या माध्यमातून स्वातंत्र्यलढ्याला वेगळी दिशा दिली. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री यांच्यासह असंख्य नेत्यांच्या नेतृत्वाखाली देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही महात्मा गांधी यांनी पाहिलेले ‘सुराज्याचे स्वप्न’ पूर्ण करण्याची जबाबदारी नव्या पिढीवर आहे. युवक, विद्यार्थी आणि नागरिकांमध्ये देशप्रेम, सामाजिक बांधिलकी, संस्कार व राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव निर्माण करण्यासाठी क्रांती दिनाचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळे या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

या कार्यक्रमास बारामतीतील युवक-युवती, विद्यार्थी-विद्यार्थिनी, व्यापारी, विविध सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, शाळा-महाविद्यालयांचे मुख्याध्यापक व शिक्षक, सरकारी व निमसरकारी अधिकारी-कर्मचारी, बारामती नगरपरिषदेचे आजी-माजी नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच सर्व नागरिकांनी राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहून क्रांती दिन साजरा करावा, असे आवाहन बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी संघटनेचे निलेशभाई कोठारी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments