पुणे, ऑगस्ट २०२६: स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत मेडीकव्हर हॉस्पिटल, भोसरी यांच्या वतीने पुणे शहरातील सुमारे ८० निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. देशाच्या सुरक्षेसाठी आणि सेवेसाठी योगदान देणाऱ्या माजी सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमाला मेडीकव्हर हॉस्पिटलचे सेंटर हेड डॉ. व्यास मौर्य, अमोल मुळे, शुभम काळे आणि डॉ. पूजा निंबाळकर उपस्थित होते. तसेच एक्स-सर्व्हिसमेन डेव्हलपमेंट असोसिएशन, दिघी, पुणेचे अध्यक्ष कॅप्टन भास्कर आंब्रे आणि संयुक्त सचिव तसेच दिघीचे नगरसेवक कॅप्टन कृष्णा सुरुकुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी निवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. देशसेवेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या शौर्य, त्याग आणि समर्पणाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
“देशाच्या रक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या माजी सैनिकांचा सन्मान करणे ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या शौर्य आणि त्यागामुळे देशाची सुरक्षा अधिक बळकट झाली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने त्यांच्या योगदानाला सलाम करण्याची संधी मिळणे ही आमच्यासाठी विशेष बाब आहे,” असे डॉ. व्यास मौर्य यांनी सांगितले.
या उपक्रमातून देशसेवेला सलाम करण्यासोबतच समाजात माजी सैनिकांप्रती आदर आणि कृतज्ञतेची भावना दृढ करण्याचा संदेश देण्यात आला.


