पुणे, दि. १७ : पुणे जिल्ह्यात विशेष पुनरिक्षण प्रक्रियेअंतर्गत (SIR) मतदारांच्या एन्युमरेशन फॉर्मच्या वितरणापासून ते डिजिटलायझेशनपर्यंतची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. जिल्ह्यातील तब्बल ९० लाख ८० हजार १७३ मतदारांना एन्युमरेशन फॉर्मचे वाटप करण्याचे काम ९९.९९ टक्के पूर्ण झाले असून, ९९.९४ टक्के फॉर्मचे डिजिटलायझेशनही पूर्ण झाले आहे. या प्रक्रियेदरम्यान मतदारांच्या जुन्या व सध्याच्या नोंदींमध्ये आढळलेल्या तफावतींच्या ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमलीज समोर आल्या असून, संबंधित मतदारांना सुनावणीची संधी देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यातील SIR अंतर्गत एन्युमरेशन फॉर्म वितरणाची मोहीम आता पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात एकूण ९० लाख ८० हजार १७३ मतदार असून, त्यांना फॉर्म वाटपाची प्रक्रिया जवळपास शंभर टक्के पूर्ण झाली आहे. फॉर्मचे डिजिटलायझेशनही अंतिम टप्प्यात असून, आतापर्यंत ९९.९४ टक्के फॉर्म डिजिटल करण्यात आले आहेत.
वय, नाव अथवा मॅपिंगमधील तफावतींमुळे अॅनोमली
डिजिटलायझेशनच्या प्रक्रियेत ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमलीज आढळून आल्या आहेत. २००२ मधील मतदाराच्या नोंदीतील वय आणि सध्याच्या नोंदीतील वय यामध्ये अपेक्षित ताळमेळ नसणे, नावामध्ये काही चूक असणे किंवा मॅपिंगच्या प्रक्रियेत त्रुटी राहणे, अशा विविध कारणांमुळे अॅनोमली निर्माण होऊ शकते.
विशेषतः मॅपिंग करताना दोन भावंडांमधील वयाचा फरक नऊ महिन्यांपेक्षा कमी दाखविला गेल्यासही सॉफ्टवेअरमध्ये अॅनोमली निर्माण होऊ शकते. त्यामुळे अॅनोमली आढळली म्हणजे संबंधित मतदाराची नोंद चुकीचीच आहे, असे गृहीत धरले जाणार नाही. अशा सर्व प्रकरणांची सुनावणी घेऊन आवश्यक ती पडताळणी केली जाणार आहे.
*अॅनोमली मतदारांना सुनावणीची संधी*
अॅनोमलीमध्ये आलेल्या सर्व मतदारांसाठी सुनावणीच्या कालावधीत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून नोटिसा जनरेट करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित मतदारांची सुनावणी घेऊन त्यांच्या नोंदींबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे.
*’नो लिंकज’ प्रकरणांचीही सुनावणी*
अॅनोमलीप्रमाणेच ‘नो लिंकज’ असलेल्या मतदारांचीही सुनावणी घेण्यात येणार आहे. २००२ च्या मतदार यादीमध्ये ज्यांचे नाव नव्हते आणि त्यांच्याशी संबंधित आई, वडील, आजी, आजोबा किंवा अन्य नातेवाईकांची नोंद २००२ च्या यादीशी जोडता आली नाही, अशा मतदारांचा समावेश ‘नो लिंकज’मध्ये करण्यात आला आहे.
या मतदारांनाही त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात येणार असून, सुनावणीनंतर नियमानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल.
*ASD यादी संकेतस्थळावर उपलब्ध*
दरम्यान, ASD (Absent, Shifted, Dead आणि Duplicate) मतदारांच्या सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय याद्या जिल्हाधिकारी, पुणे यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी या याद्यांमध्ये आपले नाव आहे किंवा नाही, याची तपासणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
ASD यादीमध्ये एखाद्या मतदाराचे नाव आढळल्यास संबंधित मतदाराने फॉर्म क्रमांक ६ भरून नव्याने मतदार नोंदणीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
*राज्य बदलल्यास फॉर्म ६ आणि ७*
एखादा मतदार पूर्वी गोवा, बिहार किंवा अन्य राज्यात मॅप झालेला असेल आणि त्याची नोंद महाराष्ट्रात करावयाची असेल, तर संबंधित जुन्या ठिकाणी फॉर्म क्रमांक ७ भरावा लागेल. त्यानंतर महाराष्ट्रात फॉर्म क्रमांक ६ भरून मतदार नोंदणी करावी लागेल.
मतदाराचा केवळ पत्ता बदलायचा असल्यास नियमानुसार फॉर्म क्रमांक ८ भरून पत्ता बदलाची प्रक्रिया करता येणार आहे.
येत्या तीन दिवसांत निवडणूक नोंदणी अधिकारी (ERO) मतदारांकडून आवश्यक कागदपत्रे घेऊन अॅनोमली नोंदी दूर करण्याची प्रक्रिया राबविणार आहेत. सध्या ७ लाख २५ हजार ४९ अॅनोमली आणि ८ लाख १८ हजार ३९८ ‘नो लिंकज’ मतदार, असे एकूण १५ लाख ४३ हजार ४४७ मतदार सुनावणीसाठी अपेक्षित आहेत. मात्र, कागदपत्रांच्या पडताळणीतून अॅनोमली दूर झाल्यास संबंधित मतदारांची संख्या कमी होऊन त्यांना सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही.
डिजिटलायझेशनची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आणखी तीन दिवसांचा कालावधी असून, या कालावधीत उर्वरित सर्व काम पूर्ण करण्यात येणार आहे.


