Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम ...

महापालिका मुख्यालयात डेंग्यू-मलेरिया प्रतिबंधासाठी तपासणी मोहीम कूलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्यांसह पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी

पिंपरी १७ ऑगस्ट २०२६ : पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या वतीने महापालिका मुख्यालय परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या वेळी मुख्य इमारतीसह महापालिका आवारातील कूलर, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, पाण्याच्या टाक्या तसेच पाणी साचण्याची शक्यता असलेल्या विविध ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम आणि उपआयुक्त डॉ. प्रदीप ठेंगल, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करणे अधिक प्रभावी ठरते. त्यामुळे महापालिका मुख्यालयासह सर्व शासकीय व सार्वजनिक आस्थापनांच्या परिसरात डासांची उत्पत्तीस्थळे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या. तसेच नागरिकांनी घर, कार्यालय आणि परिसरात पाणी साचू न देण्याबरोबरच कूलर, कुंड्या, पाण्याच्या टाक्या आदींची नियमित स्वच्छता करावी, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

तपासणीदरम्यान कूलरमधील पाणी, कुंड्यांखालील ट्रे, पाण्याच्या टाक्या, वापरात नसलेली भांडी, शोभेच्या झाडांच्या कुंड्या, कार्यालयीन परिसर, वाहनतळ तसेच अन्य ठिकाणी पाणी साचले आहे का, याची पाहणी करण्यात आली. ज्या ठिकाणी पाणी साचलेले आढळून आले, तेथील पाणी तत्काळ काढून टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. परिसरात स्वच्छता राखण्यासह भविष्यात पाणी साचणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या तसेच, महापालिकेकडून डेंग्यू मलेरिया तपासणी मोहिम वेळोवेळी राबविण्यात येणार आहे.

आरोग्य व वैद्यकीय विभागाच्या पथकांनी महापालिका मुख्यालयातील विविध विभाग, कार्यालयीन परिसर, वाहनतळ आणि आजूबाजूच्या परिसराची पाहणी केली. डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याबरोबरच अधिकारी व कर्मचाऱ्यांना डेंग्यू मलेरिया प्रतिबंधासाठी आवश्यक खबरदारीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

पावसाचे पाणी दीर्घकाळ साचून राहिल्यास डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे नागरिकांनी आपल्या घरासह कार्यालय व परिसराची नियमित पाहणी करून पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. डासांची उत्पत्तीस्थळे वेळीच नष्ट करून डेंग्यू मलेरियाचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

या वेळी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली ढोणे, ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या भोईर, वैद्यकीय अधिकारी (एनयूएचएम) डॉ. विजया आंबेडकर, सहा.आरोग्य अधिकारी श्रीराम गायकवाड, प्रशासन अधिकारी संतोष कोराड, साथरोग अधिकारी डॉ. आनंदऋषी परिमल्ला, मुख्य आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, कांचनकुमार इंदलकर,स्नेहा चांदणे, राहुल जेटीथोर, सिटी प्रोग्राम मॅनेजर चैताली इंगळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments