*
पुणे, दि. २४: मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याअन्वये ३१ ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे. तर ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर २९ ऑक्टोबर पर्यंत सुनावण्या घेण्यात येणार आहेत, अशी माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजित साप्ताहिक बैठकीत दिली.
त्या पुढे म्हणाल्या, प्राप्त झालेल्या दावे व हरकतींवर सुनावण्या घेण्याच्या अनुषंगाने प्रशासना कडून मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. सुनावण्याबाबत नियोजनबद्ध वेळापत्रक तयार करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. मतदारांना सुनावणीला उपस्थित राहण्यासाठी तीन संधी दिल्या जातील. तीनदा नोटीस देऊनही मतदार सुनावणीसाठी उपस्थित न राहिल्यास त्याचे नाव यादीतून वगळण्याची पुढील कार्यवाही करण्यात येईल.
अंतिम करण्यात आलेल्या एएसडीडी यादीनुसार ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित तर गणना फॉर्म परत जमा न करणारे ३८ हजार १०४ मतदार आहेत. एएसडीडी यादीत नाव समाविष्ट असल्यास त्या मतदाराला नव्याने फॉर्म नंबर ६ भरून द्यावा लागेल. मतदान केंद्रांच्या पुनर्रचनेमध्ये ७ मतदान केंद्रांची वाढ होऊन आता ८ हजार ४२४ मतदान केंद्र होणार असल्याची माहितीही श्रीमती कळसकर यांनी यावेळी दिली.
बैठकीला तहसीलदार शीतल मुळे यांच्यासह भारतीय जनता पक्ष, नॅशनल पीपल्स पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना आदी राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष, शहरप्रमुख, सचिव तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.
००००


