पुणे , 20 डिसेंबर २०२३ :एकीकडे जगभरातील व्यवसायांना एआयची धास्ती भरली असताना देखील कलाकारांच्या वैयक्तिक वैचारिक प्रक्रियेचे महत्त्व कायम राहणार आहे,असा विश्वास प्रख्यात वास्तूविशारद महेश नामपूरकर यांनी व्यक्त केला . पुण्यातील कलाप्रेमींसाठी आयोजित ‘रंगरस बनारस’ चित्रकला प्रदर्शनाचे उदघाटन प्रख्यात वास्तुविशारद महेश नामपूरकर व विशेष अतिथी प्रसिद्ध चित्रकार उमाकांत कानडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. हे प्रदर्शन १९ ते २४ डिसेंबर दरम्यान राजा रवि वर्मा आर्ट गॅलरी, पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक केंद्र, घोले रोड, शिवाजी नगर, पुणे येथे सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे.
महेश नामपूरकर म्हणाले की,कलाकारांच्या वैयक्तिक कलाकुसरेमुळे त्या कलाकृतींना जिवंतपणा येतो,त्यामध्ये ओलावा निर्माण होतो.एआय आणि झपाटयाने वाढणार्या तंत्रज्ञानाच्या काळात जरी या गोष्टी हरवत चालल्या असतील तरीही लोकांना ते लक्षात येईल आणि पुन्हा ते कलेला महत्त्व देऊ लागतील.तंत्रज्ञानाचा वापर हा कलेचा प्रसार करण्यासाठी केला पाहिजे,जेणे करून कलाकारांना एक व्यासपीठ मिळेल.
नामपूरकर पुढे म्हणाले की,कलेच्या प्रसार आणि प्रचाराकरिता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर मंच स्थापित झाला पाहिजे.कलाकृती प्रदर्शित करण्याबरोबरच त्याची विक्री देखील तितकीच महत्त्वाची आहे.
कॅनव्हासवर दिसणाऱ्या सुंदर दृश्यांमागे असलेल्या कलाकारांच्या मेहनतीचा प्रचार प्रसार होणे गरजेचे असून तंत्रज्ञानाच्या या काळात प्रत्येक कलाकाराने आपले वेगळेपण सिद्ध करायला हवे, असे मत प्रसिद्ध चित्रकार उमाकांत कानडे यांनी व्यक्त केले.
प्रदर्शनामध्ये संदीप यादव, प्रथमेश जोग आणि विनोद कोरे या कलाकारांच्या कुंचल्यांतून साकारलेल्या सुंदर आणि आध्यात्मिक वाराणसी घाटांच्या कलाकृती सादर करण्यात येणार आहेत. वॉटर कलर तसेच ऍक्रेलिक रंगांचा वापर करून साकारण्यात आलेल्या कलाकृती कला रसिकांसाठी एक वेगळाच अनुभव ठरणार असून, कलाकारांच्या कुंचल्यांतून कॅनव्हासवर चित्रित केलेल्या वाराणसी येथील गंगा घाटचे सुंदर रूप यावेळी कलाप्रेमींना बघायला मिळेल.


