Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorized*गणेशोत्सव काळात पुणे शहरातील वाहतुकीत बदल* *१८ ते...

*गणेशोत्सव काळात पुणे शहरातील वाहतुकीत बदल* *१८ ते २५ सप्टेंबरदरम्यान आवश्यकतेनुसार विविध मार्गांवर वाहतूक बंद; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. १७ : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध भागांमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे दि. १८ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आवश्यकतेनुसार विविध मार्गांवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

 

गणेशोत्सवातील देखावे व रोषणाई पाहण्यासाठी शहर तसेच शहराबाहेरील नागरिक मोठ्या संख्येने येत असल्याने वाहतुकीवर वाढणारा ताण लक्षात घेऊन हे बदल करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेतील अग्निशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी वाहनांना या वाहतूक निर्बंधातून वगळण्यात आले आहे.

 

*प्रमुख मार्गांवर वाहतूक बंद*

दि. १८ सप्टेंबर रोजी लक्ष्मी रस्त्यावरील हमजेखान चौक ते सेवासदन चौक, शिवाजी रस्त्यावरील गाडगीळ पुतळा ते रामेश्वर चौक तसेच आप्पा बळवंत चौक ते मोती चौक या मार्गांवर वाहतूक बंद करण्यात येणार आहे. लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीसाठी डुल्या मारुती चौकातून उजवीकडे वळून दारूवाला पूलमार्गे इच्छितस्थळी जाता येईल. तसेच हमजेखान चौकातून डावीकडे वळून महाराणा प्रताप रस्ता, घोरपडी पेठ पोलीस चौकी, शंकरशेठ रस्त्याचा वापर करता येईल. शिवाजी रस्त्यावरून स्वारगेटकडे जाणाऱ्या वाहनांनी स. गो. बर्वे चौक–जे. एम. रस्ता–अलका चौक–टिळक रस्ता अथवा शास्त्री रस्त्याचा वापर करावा. पर्यायी मार्ग म्हणून सिमला चौक–कामगार पुतळा चौक–शाहीर अमर शेख चौक–बोल्हाई चौक–नेहरू रस्ता या मार्गाचाही वापर करता येईल. आप्पा बळवंत चौक ते मोती चौक या मार्गासाठी बाजीराव रस्त्याचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

दि. १८ ते २५ सप्टेंबरदरम्यान दररोज सायंकाळी ५ वाजल्यापासून गर्दी संपेपर्यंत आवश्यकतेनुसार लक्ष्मी रस्त्यावरील सेवासदन चौक ते टिळक चौक, शिवाजी रस्त्यावरील रामेश्वर चौक ते जेधे चौक, बाजीराव रस्त्यावरील पुरम चौक ते आप्पा बळवंत चौक, सिंहगड गॅरेज–घोरपडी पेठ ते राष्ट्रभूषण–हिराबाग चौक, दिनकरराव जवळकर पथ ते पायगुडे चौक–हिराबाग चौक या मार्गांवर सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यासोबतच कै. अनंत बाळकृष्ण नाईक पथावरील जगदीश गॅरेज उपरस्ता ते टिळक रस्त्याकडे जाणारी वाहतूक, सणस रस्त्यावरील गोटीराम भैय्या चौक ते गोविंद हलवाई चौक, पानघंटी चौक ते गंजपेठ चौकी, गंजपेठ चौकातून वीर लहुजी वस्ताद तालीमकडे जाणारा मार्ग, गावकसाब मशिद ते सेंट्रल स्ट्रीट चौकी, कोहिनूर चौक ते बाबाजान चौक या मार्गांवरही आवश्यकतेनुसार वाहतूक बंद राहणार आहे.

 

या मार्गांवरील वाहतूक परिस्थितीनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असून बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, कस्तुरे चौक, फुलवाला चौक, भगवान महावीर चौक, सरबतवाला चौक, शिवाजी रस्ता, शंकरशेठ रस्ता आदी मार्गांचा वापर करता येईल. जेधे प्रसाद रस्ता व सुभानशहा रस्त्यावरील पार्श्वनाथ चौक ते शास्त्री चौक तसेच सुभानशहा दर्गा ते सोन्या मारुती चौक या मार्गावरील वाहतूकही आवश्यकतेनुसार पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. गुरुनानक पथावर हमजेखान चौक ते देवजीबाबा चौक या दिशेने वरील कालावधीत आवश्यकतेनुसार प्रवेशास परवानगी देण्यात येणार आहे.

 

*एकेरी वाहतुकीतही आवश्यकतेनुसार बदल*

पादचाऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेऊन कुमठेकर रस्ता, सदाशिवपेठ, फडके हौद रस्ता, सिंहगड गॅरेज ते मनपा कार्यशाळा चौक (नाईक रस्ता) तसेच कोहिनूर हॉटेल ते भगवान महावीर चौक (एम. जी. रस्ता) या मार्गांवरील एकेरी वाहतुकीचे आदेश आवश्यकतेनुसार तात्पुरते शिथील करून दुहेरी वाहतूक करण्यात येणार आहे. तसेच पुरम चौक ते गाडगीळ पुतळा दरम्यान टेलिफोन भवन ते पुरम चौक या मार्गावरील एकेरी वाहतूकही आवश्यकतेनुसार तात्पुरती दुहेरी करण्यात येणार आहे.

 

*सहा मार्गांवर ‘नो पार्किंग’*

गणेशोत्सव काळात वाहतुकीचा सुरळीत प्रवाह कायम राहावा यासाठी शिवाजी रस्ता जिजामाता चौक ते मंडई चौक, मंडई ते शनिपार चौक, बाजीराव रस्ता शनिपार चौक ते फुटका बुरुज, आप्पा बळवंत चौक ते मोती चौक, टिळक रस्ता एस. पी. कॉलेज मुख्य प्रवेशद्वार ते टिळक चौक आणि शास्त्री रस्ता सेनादत्त पोलीस चौकी ते टिळक चौक या मार्गांच्या दोन्ही बाजूंना ‘नो पार्किंग’ लागू करण्यात आले आहे.

 

पादचाऱ्यांची गर्दी वाढल्यास सायंकाळी ५ वाजल्यानंतर परिस्थितीनुसार संबंधित मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक बंद असलेल्या मार्गावर वाहने न आणता वाहतूक शाखेने सुचविलेल्या पर्यायी मार्गांचा किंवा अन्य उपलब्ध मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे शहर वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments