Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय संस्कृती जगाला विनाशाच्या छायेतून वाचवेल विश्वधर्मी प्रा....

भारतीय संस्कृती जगाला विनाशाच्या छायेतून वाचवेल विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड

 

विश्व शांती दिवस ( इंटरनॅशनल पीस डे) निमित्त एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये परिसंवाद

 

पुणे, दि. २१ सप्टेंबर: जगभरात सुरू असलेली युद्धे, दहशतवादी कारवाया आणि हिंसक संघर्षांमुळे मानवी जीवनाचे होणारे प्रचंड नुकसान अत्यंत चिंताजनक आणि निंदनीय आहे. वांशिक आणि जातीय हिंसाचारात निष्पाप लोकांची होणारी हत्या देखील दुर्दैवी आहे. अशा भीषण संकटांचा सामना करणाऱ्या जगाला शांततेची नितांत गरज आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ आणि ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’ हा भारतीय संस्कृतीचा संदेश संपूर्ण जगाला विनाशाच्या छायेतून वाचवू शकतो, असे विचार माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी व्यक्त केले.

 

सर्व राष्ट्रांमध्ये आणि लोकांमध्ये शांततेच्या आदर्शांचे स्मरण आणि बळकटीकरण करण्यासाठी समर्पित दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता दिन. याचे औचित्य साधून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीतर्फे ‘विश्वात शांतीची गरज’ या विषयावर डॉ. कराड यांच्या दालनात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.

 

यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड, कुलगुरू प्रा. डॉ. रविराज एन. सिताराम , नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस. एन. पठाण, प्रसिद्ध गप्पाष्टककार व वरिष्ठ सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, डब्ल्यूपीयूचे कुलसचिव प्रा. गणेश पोकळे, पीस स्टडीचे प्रा. डॉ. मिलिंद पात्रे, डॉ. महेश थोरवे, मंदार बोकिल, अजय महाजन आणि योगेश पारखी उपस्थित होते.

 

डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर माऊली ते सहस्रकातील श्रेष्ठ शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्या ज्ञान-विज्ञान संगमातील तत्त्वज्ञानाचा पाया हा भारतीय मूळ विचारधारा असणाऱ्या अद्वैताचा आहे. ओम् आणि E=mc² या सिद्धांताचा प्रवासच विश्वाच्या कल्याणाचे सूत्र आहे. हेच सूत्र संपूर्ण विश्वाला भारतमातेच्या रूपात विश्वगुरू बनून शांती व समृद्धीचा मार्ग दाखवेल.”

 

डॉ. राहुल कराड म्हणाले, “शांततेची संस्कृती विकसित करण्यात शिक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. शाळा आणि उच्च शिक्षण संस्था सहिष्णुता, विविधता, मानवाधिकार, संवाद आणि अहिंसक संघर्ष निराकरण याबद्दलची समज वाढवू शकतात. डिजिटल युगात माध्यम आणि समाजमाध्यम साक्षरता देखील महत्त्वपूर्ण झाली आहे, कारण चुकीची माहिती सामाजिक तणाव वाढवू शकते.”

 

प्रा. डॉ. रविराज एन. सिताराम म्हणाले, “युद्धे, दहशतवाद आणि संघर्षांनी ग्रासलेल्या जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाज उठवणे हेच आज जागतिक शांतता दिनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”

 

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,* “एकीकडे जागतिक युद्धाचे गंभीर संकट घोंगावत आहे, तर दुसरीकडे हिंसाचार, रक्तपात आणि दहशतवादाने जगाला संशयाच्या अंधारात लोटले आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे परस्पर सामंजस्य आणि वैश्विक बंधुत्वाची भावना.”

‘एंजल ऑफ वर्ल्ड पीस’ ने सन्मानित डॉ. कराड यांनी गेल्या चार दशकांहून अधिक काळ शिक्षण, तत्त्वज्ञान, अध्यात्म आणि जागतिक शांततेसाठी कार्य केले असून विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून मूल्याधारित वैश्विक शिक्षण प्रणाली अंमलात आणली. जगातील सर्वात मोठ्या विश्वशांती घुमटाची निर्मिती करून त्यांनी जगाला सर्वधर्मसमभाव आणि विश्वबंधुत्वाचा संदेश दिला आहे. या कार्याची दखल घेत डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना अमेरिकेतील अकादमी ऑफ युनिव्हर्सल ग्लोबल पीस आणि युनिव्हर्सिटी ऑफ ग्लोबल पीस यांच्या वतिने एजल ऑफ वर्ल्ड पीस या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. असा उल्लेख ही उपस्थितांनी केला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments