पुणे, दि. २१ : पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमातून गणेशखिंड येथील मॉडर्न आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना बार्टीच्या विविध योजना, उपक्रम तसेच त्यांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
*‘लोकसंवाद-२०२६’* च्या माध्यमातून विविध शासकीय विभागांच्या योजना, उपक्रम आणि लोककल्याणकारी सेवांची माहिती नागरिक व विद्यार्थ्यांपर्यंत थेट पोहोचविण्यात येत आहे. याच उपक्रमांतर्गत आयोजित कार्यक्रमात बार्टीच्या प्रकल्प अधिकारी शीतल बंडगर यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. योजनांसाठीची पात्रता, अर्ज प्रक्रिया, उपलब्ध संधी तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक बाबींबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी समतादूत उषा कांबळे यांनी ‘मी सावित्रीबाई बोलतेय’ या एकपात्री नाट्यप्रयोगातून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याचे प्रभावी सादरीकरण केले. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवताना सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्यांना आलेल्या सामाजिक अडचणी आणि शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तनासाठी दिलेले योगदान या नाट्यप्रयोगातून प्रभावीपणे मांडण्यात आले.
कार्यक्रमास भौतिकशास्त्र विभागप्रमुख तथा महाविद्यालयाच्या समान संधी केंद्राचे समन्वयक श्री. वाघमारे, भूगोल विभागप्रमुख श्री. मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. खरात यांचे सहकार्य लाभले.


