पुणे,दि. ५ : महाराष्ट्र विधानपरिषद पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या अनुषंगाने निवडणूक प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाच्या वापरावर जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये निर्बंध लागू केले आहेत.
या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्ती, संस्था, पक्ष कार्यकर्त्यांना पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा (लाऊडस्पीकर) वापर करता येणार नाही. तसेच सकाळी ६ वाजण्यापूर्वी आणि रात्री १० वाजल्यानंतर फिरत्या वाहनावर अथवा कोणत्याही क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रचारासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा लागेल. फिरत्या वाहनास रस्त्यावरून धावत असताना ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही.
सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व इतर संबंधित व्यक्तींनी निश्चित ठिकाणी ध्वनिक्षेपक वापराबाबतची परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तसेच संबंधित यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.
*होर्डिंग, बॅनर्स,पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास परवानगी आवश्यक*
या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासकीय, निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात सक्षम प्राधिकार्याचे पूर्वपरवानगीशिवाय होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहिरात प्रदर्शित करण्यात निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.
*प्रचारासाठी वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास निर्बंध*
जिल्ह्यात कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहापेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांचा ताफ्याचा वापर करण्यावर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत.
हे आदेश पुणे जिल्ह्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. आदेशांचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदीनुसार दंडनीय कारवाईस पात्र राहतील.
०००


