पुणे, दि. ६ : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ ची प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने पुणे जिल्ह्यात विविध निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-२०२३ मधील कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून पुणे जिल्ह्यात निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या जात, भाषा अथवा धर्मावर आधारित शिबिरांचे आयोजन करण्यास निर्बंध घातले आहेत.
तसेच निवडणुकीच्या प्रचारासाठी सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी तसेच सार्वजनिक रस्त्यांवर निवडणूकविषयक पोस्टर्स, बॅनर्स, पॅम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी आदी लावल्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने अशा प्रकारे प्रचार साहित्य लावण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.
हा आदेश पुणे जिल्ह्यासाठी निर्गमित झाल्याच्या तारखेपासून ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत लागू राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता-२०२३ मधील कलम २२३ मधील तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल.
०००


