*पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने निवृत्तीवेतनधारकांसाठी कार्यशाळा; ३५० हून अधिक निवृत्तीवेतनधारकांचा सहभाग*
▪️*निवृत्तीवेतन सुविधांचा लाभ घेण्यासाठी ‘महा उपलब्धी’ ॲपचा वापर करण्याचे आवाहन*
पुणे, दि. ९ : महाराष्ट्र शासनाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘महा उपलब्धी’ या मोबाईल ॲपची माहिती, वैशिष्ट्ये आणि नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यासाठी पुणे जिल्हा कोषागार कार्यालयाच्या वतीने जिल्हा परिषद येथील शरदचंद्रजी पवार सभागृहात विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला ३५० हून अधिक निवृत्तीवेतनधारकांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी पुणे जिल्ह्याच्या वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती गायत्री तुकाराम जाधव यांनी उपस्थित निवृत्तीवेतनधारकांचे स्वागत केले. यावेळी संचालनालय लेखा व कोषागारे कार्यालयाचे उपसंचालक (निवृत्तीवेतन) प्रमोद पाटील, सहाय्यक लेखा अधिकारी (निवृत्तीवेतन) प्रशांत डोंगरे तसेच पुणे विभागाच्या सहसंचालक, सहसंचालनालय लेखा व कोषागारे श्रीमती भारती देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
*ॲपची वैशिष्ट्ये आणि नोंदणी प्रक्रियेची सविस्तर माहिती*
कार्यशाळेत श्री. डोंगरे यांनी ‘महा उपलब्धी’ मोबाईल ॲपचे महत्त्व, त्यामधील विविध सुविधा, नोंदणी प्रक्रिया आणि ॲपचा प्रत्यक्ष वापर याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतनविषयक माहिती सहज उपलब्ध व्हावी, विविध कामांसाठी कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता कमी व्हावी आणि शासकीय सेवा डिजिटल माध्यमातून अधिक सुलभपणे मिळाव्यात, या दृष्टीने या ॲपचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून निवृत्तीवेतनविषयक सेवा अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि गतिमान करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांची माहिती यावेळी देण्यात आली. निवृत्तीवेतनधारकांनी आधुनिक डिजिटल सुविधांचा स्वीकार करून ‘महा उपलब्धी’ ॲपचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करून ॲपच्या वापराबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
*मान्यवरांचा सत्कार; राज्य निवृत्तीवेतन संघटनेतर्फे गौरव*
कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचा वरिष्ठ कोषागार अधिकारी श्रीमती गायत्री जाधव यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच, ‘महा उपलब्धी’ मोबाईल ॲप यशस्वीरीत्या सुरू केल्याबद्दल राज्य निवृत्तीवेतन संघटनेच्या वतीने संचालक, संचालनालय लेखा व कोषागारे श्रीमती दीपा देशपांडे यांचा विशेष गौरव करण्यात आला.
कार्यशाळेच्या आयोजनातून निवृत्तीवेतनधारकांपर्यंत डिजिटल सुविधांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. निवृत्तीवेतनधारकांना तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वावलंबी बनविणे आणि शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळवून देणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
सहायक संचालक (निवृत्तीवेतन) देवराम शेळके यांनी उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांचे आभार मानले.
०००


