पुणे, दिनांक ९ ऑक्टोबर २०२६ :
“मुलींना कुटुंब पालन, शिवणकाम आणि मुलांचे संगोपन यांचे शिक्षण दिले जाईल, अशी जाहिरात करणारी युरोपीय परंपरा ही ‘चूल आणि मूल’ या विचारांची होती. याउलट, भारतात मात्र कित्येक सहस्रकांपासून महिलांची बौद्धिक परंपरा विदुषी म्हणून अतिशय समृद्ध राहिली आहे. आपल्या अभ्यासक्रमात भारतीय विदुषींच्या इतिहासाचा समावेश व्हायला हवा,” असे मत चिन्मय विद्यापीठाच्या अधिष्ठाता व लेखिका डॉ. गौरी माहुलीकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ‘दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्रा’च्या वतीने ‘भारतीय विदुषी आणि लेखिका : सन १ ते १८५७’ या पुस्तकाच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी आवृत्यांचे प्रकाशन डॉ. माहुलीकर यांच्या हस्ते झाले. या वेळी विचारवंत आणि पुस्तकाचे लेखक मिलिंद ओक आणि डॉ. अंजली देशपांडे उपस्थित होते.
डॉ. माहुलीकर पुढे म्हणाल्या, “आपल्या इतिहासात राजे-महाराजे, लढाया आणि विद्वान पुरुषांचा इतिहास शिकवला जातो. मात्र, काव्य, साहित्य आणि वेदांताचा गाढा अभ्यास करणाऱ्या विदुषींचा इतिहास उपेक्षित राहिला. गुरुकुल, मठ आणि मंदिरांमधून महिलांना शिक्षण दिले जात असे. शिलालेख, ताम्रपट आणि हस्तलिखितांमधून त्यांची नावे उघडकीस येतात. वैदिक, जैन, तंत्र, बौद्ध आणि भक्तिपरंपरेतील स्त्रियांचे साहित्यात मोठे योगदान आहे. त्या काळात स्त्रिया केवळ साक्षर नव्हत्या, तर त्या आचार्य आणि साहित्यिक होत्या. दुर्दैवाने आपल्याला या परंपरेचा विसर पडला आहे.”
लेखक मिलिंद ओक यांनी भारतातील स्त्री-शिक्षणाच्या जिवंत परंपरेवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “वात्स्यायनाने महिलांसाठी ६४ कलांचे ज्ञान सांगितले होते. याचाच अर्थ त्या काळात महिला शिक्षण घेत होत्या. राणी भट्टारिका यांच्या संस्कृत कवितेतूनच कवयित्री शांता शेळके यांनी ‘तोच चंद्रमा नभात’ या प्रसिद्ध गीताची प्रेरणा घेतली होती. तंजावर राज्याच्या दरबारात अष्टावधान पारंगत आणि विविध भाषा शिकलेल्या महिला होत्या, ज्यांनी ग्रंथांचे अनुवाद केले.”
ते पुढे म्हणाले, “१० व्या शतकात राजशेखराची पत्नी अवंतीसुंदरी ही प्राकृत भाषेतील तज्ज्ञ होती. १२ व्या शतकात पंडित हेमचंद्र यांनी ‘देशीनाममाला’ हा ग्रंथ लिहिताना अवंतीसुंदरीला प्रामाणिक संदर्भ (ऑथॉरिटी) मानले होते. भारतात महिलांना शिक्षण नव्हते हा एक मोठा गैरसमज आहे. ब्रिटिश काळातील मूळ कागदपत्रे आणि अहवालांनुसार, घरगुती पाठशाळांमध्ये मुली शिक्षण घेत होत्या. इंग्रजी पद्धतीनुसार १८४० ते १८६० दरम्यान देशभरात ५०० पेक्षा जास्त मुलींच्या शाळा सुरू झाल्या होत्या. महात्मा फुलेंच्या शाळेला सुरुवातीला विरोध झाला असला, तरी अवघ्या तीन वर्षांत त्याच शाळेत २५० मुलींची परीक्षा झाली आणि समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला.”
डॉ. अंजली देशपांडे म्हणाल्या, “हे पुस्तक म्हणजे हजारो वर्षांच्या संस्कृतीतून निर्माण झालेले एक आनंददायी दालन आहे. यातून भारतीय स्त्रियांच्या दोन हजार वर्षांच्या समृद्ध शिक्षण परंपरेचे दर्शन घडते. ब्रिटिशांनी औपचारिक शिक्षणाचा केलेला दावा किती तोकडा होता, हे यावरून स्पष्ट होते. भारतीय समाजाने स्त्रियांना कधीही अभिव्यक्त होण्यापासून वंचित ठेवले नाही.” कार्यक्रमाचे प्रास्ताविक रंजना खरे यांनी केले, तर पुस्तकाचे मुखपृष्ठ सागर नेने यांनी तयार केले आहे. स्वाती लेले यांनी सूत्रसंचालन केले.


