▪️*‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ गर्भवती माता व किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी, पोषणविषयक जनजागृतीवर भर*
पुणे, दि. १२ (जिमाका, वृत्तसेवा) : गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुदृढ राखून रक्तक्षयाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हा परिषद पुणेच्या आरोग्य विभागामार्फत ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत – सक्षम माता, सशक्त किशोरी, रक्तक्षयमुक्त पुणे’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून हिमोग्लोबिन तपासणी, पोषणविषयक जनजागृती, वेळेवर निदान आणि योग्य उपचार यावर भर देण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांतर्गत गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करून रक्तक्षयाचे लवकर निदान करण्याचे उद्दिष्ट आहे. रक्तक्षय आढळलेल्या लाभार्थ्यांना वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार, लोह व फॉलिक अॅसिडच्या गोळ्यांचे नियमित सेवन आणि आवश्यक पुनर्तपासणीबाबत मार्गदर्शन केले जात आहे.
*पोषणविषयक जनजागृतीवर भर*
रक्तक्षय टाळण्यासाठी संतुलित आणि सकस आहाराचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे. आहारात हिरव्या पालेभाज्या, कडधान्ये, नाचणी, शेंगदाणे यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच आवळा, लिंबू आणि पेरू यांसारख्या ‘क’ जीवनसत्त्वयुक्त पदार्थांमुळे शरीरातील लोहाचे शोषण सुधारण्यास मदत होते, याबाबतही जनजागृती केली जात आहे.
जेवणासोबत चहा किंवा कॉफी घेणे टाळावे, तसेच रक्तक्षय आढळल्यास केवळ आहारावर अवलंबून न राहता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावेत, असे मार्गदर्शन लाभार्थ्यांना केले जात आहे.
*आरोग्य यंत्रणेच्या समन्वयातून अभियान*
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या समन्वयातून या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. माता आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढविणे, रक्तक्षयाचे दुष्परिणाम रोखणे आणि नियमित तपासणीची सवय निर्माण करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी गर्भवती माता आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुदृढ ठेवणे ही निरोगी समाजाच्या निर्मितीची गुरुकिल्ली असल्याचे नमूद केले. तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी वेळेवर निदान, पोषक आहार आणि योग्य उपचार या त्रिसूत्रीच्या माध्यमातून रक्तक्षयाचे दुष्परिणाम टाळण्यास मदत होत असल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील माता आणि किशोरवयीन मुलींचे आरोग्य सुधारण्यासाठी तसेच रक्तक्षयमुक्त पुण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
0000


