पिंपरी- शहरातील रस्त्यावरील बीआरटी रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता करण्यासाठी मनपामार्फत मनपाच्या मैलाशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणेत येत आहे. सदर काम महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाच्या टँकरमार्फत करणेत येत आहे. त्यामुळे नागरिकांच्या पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी उपलब्ध असलेल्या शुद्ध पाण्याचा वापर यासाठी केला जात नाही.
स्वच्छतेचा उद्देश केवळ सुशोभीकरण नसून रस्ते सुरक्षितता
नुकत्याच झालेल्या पावसाळ्यामुळे रस्त्यावरील चिखल, माती व धूळ बीआरटी रेलिंग आणि दुभाजकांवर साचलेली आहे. या थरामुळे रेलिंगचा रंग, दुभाजकांच्या कडा आणि त्यावरील परावर्तक पट्टे झाकले जाऊन ते वाहनचालकांना स्पष्टपणे दिसण्यात अडथळा निर्माण झालेला आहे. त्यामुळे ही स्वच्छता केवळ सौंदर्यीकरणाचा भाग नसून रस्ते सुरक्षिततेशी संबंधित देखभाल दुरुस्तीचे महत्वपूर्ण कार्य म्हणून करणेत येत आहे.
नुकतीच बीआरटी रेलिंगला स्कूल बसची धडक झाल्याची घटना घडलेली आहे. तथापि, अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर रेलिंग व दुभाजकांची दृश्यता कायम ठेवणे आणि संभाव्य धोकादायक ठिकाणांची स्वच्छता करणे या प्रतिबंधात्मक उपायांना महानगरपालिका महत्त्व देत आहे.
आगामी पुणे ग्रँड टूर-२०२७ सायकल स्पर्धेच्या तयारीसोबत नियमित देखभालीलाही प्राधान्य
आगामी ‘पुणे ग्रँड टूर-२०२७’ सायकल स्पर्धेच्या अनुषंगाने संबंधित बीआरटी मार्गांची स्वच्छता व देखभाल करणेत येत आहे. तथापि, रेलिंग व दुभाजकांची स्वच्छता ही केवळ स्पर्धेपुरती किंवा शहराच्या सुशोभीकरणापुरती मर्यादित नाही. दैनंदिन प्रवास करणारे नागरिक, शालेय वाहने, सार्वजनिक वाहतूक आणि इतर वाहनचालकांसाठी रस्त्यावरील संरक्षक व्यवस्था स्पष्टपणे दिसणे, हे देखील या कामाचा महत्त्वाचा उद्देश आहे.
जलसंवर्धन आणि नागरिकांची सुरक्षितता यांचा समतोल
पाणीटंचाईच्या परिस्थितीत पिण्याच्या पाण्याचे संवर्धन करणे अत्यावश्यक आहे. त्याचवेळी सार्वजनिक रस्त्यांची आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेची कामेही करणे क्रमप्राप्त आहे. या दोन्ही बाबींचा विचार करून महानगरपालिका प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर करीत आहे.
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महानगरपालिकेच्या स्वच्छता व रस्ते सुरक्षिततेच्या कामांना सहकार्य करावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
-बापुसाहेब गायकवाड सह शहर अभियंता
पिंपरी -चिंचवड शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्था याकामी उत्तम सहकार्य करत आहेत, या मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना महापालिका सन्मानित करणार आहे असे मनपा आयुक्त डॉ.विजयकुमार सुर्यवंशी यांनी सांगितले आहे.


