Thursday, November 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!* ...

महाज्योतीच्या ५१ विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी भरारी!* *टॅबलेट वितरणातून विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; ज्ञान, कौशल्यवृद्धीसाठी प्रभावी वापर करा*

 

 

पुणे,(जिमाका वृत्तसेवा) दि. 5: महात्मा जोतिबा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षे सुरु आहे. त्यानिमित्ताने आणि डिजिटल युगात शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) आणि सहायक संचालक इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपयोगासाठी टॅबलेटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी एकूण ८३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून, टॅबलेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची नवी दिशा मिळणार आहे.

 

प्रादेशिक उपसंचालक कार्यालय, पुणे विभागाचे लेखाधिकारी सुनील कोतवाल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, शिक्षण हे केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकास, आत्मनिर्भरता आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात पदवीसोबतच ज्ञान, कौशल्य, संवादकौशल्य आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असणे अत्यंत आवश्यक आहे.

 

टॅबलेट हे केवळ इलेक्ट्रॉनिक उपकरण नसून ज्ञानाची नवी दालने खुली करणारे प्रभावी साधन आहे. विद्यार्थ्यांनी त्याचा उपयोग ऑनलाइन शिक्षण, स्पर्धा परीक्षांची तयारी, कौशल्य विकास तसेच कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान मिळविण्यासाठी करावा. सोशल मीडिया आणि मनोरंजनात वेळ खर्च करण्याऐवजी तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करून स्वतःची गुणवत्ता वाढवावी, असे आवाहन कोतवाल यांनी केले.

 

विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पष्ट ध्येय निश्चित करावे. सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे योग्य नियोजन आणि आत्मविश्वासाच्या बळावर यश संपादन करावे. विकसित भारत २०४७ चे स्वप्न साकार करण्यासाठी ज्ञानसंपन्न, कौशल्यपूर्ण आणि सामाजिक बांधिलकी जपणारी तरुण पिढी घडणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

 

यावेळी टॅबलेटचा लाभ मिळालेल्या एका विद्यार्थिनीने, एका विद्यार्थ्याने तसेच दोन पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. डिजिटल साधनांमुळे शैक्षणिक अभ्यास, ऑनलाइन शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मोठी मदत होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

 

कार्यक्रमास महाज्योतीच्या वरिष्ठ संशोधन अधिकारी पल्लवी कडू, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयाच्या निरीक्षक अर्चना होले, करिअर पॉईंट संस्थाचे गंगाधर भगवत, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी जयंती इंगळे, शुभम हवळ तसेच सहाय्यक लेखाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब कोळेकर व वैशाली कोल्हे यांनी केले.

सदर कार्यक्रमासाठी प्रादेशिक उपसंचालक शशिकांत शिंदे, सहायक संचालक प्रदीप संकपाळ यांचे मार्गदर्शन लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments