एमआयटी डब्ल्यूपीयूमध्ये ‘श्रद्धा, ओळख आणि संविधान’ यावर विशेष व्याख्यान
पुणे, दि. १७ नोव्हेंबर : “येत्या २० वर्षांत देशासमोर सर्वात मोठे आव्हान राजकारणाचे असणार आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी देशाला समजूतदार आणि जागरूक नागरिकांची गरज आहे. मतदान जात पाहून नव्हे, तर उमेदवाराचे कर्तृत्व पाहून केले पाहिजे.” असा ठाम आणि स्पष्ट संदेश आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी पुण्यात दिला. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित विशेष व्याख्यानात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, स्कूल ऑफ लॉ, स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स आणि डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स अँड पब्लिक पॉलिसी यांच्या संयुक्त विद्यमाने कोथरूड येथील एसओजी हॉलमध्ये ‘श्रद्धा, ओळख आणि संविधान’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रा. डॉ. रविराज एन. सीतारमण उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यापीठाचे कार्याध्यक्ष डॉ. राहुल विश्वनाथ कराड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना डॉ. तोगडिया यांनी शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, “दरवर्षी देशातील ५ लाख विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशात जात आहेत. ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेत गुणवत्तापूर्ण सुधारणा करावी लागेल, शिक्षणासाठी जीडीपी वाढवावा लागेल आणि शुल्क कमी करावे लागेल, जेणेकरून देशातील प्रत्येक मूल शिकू शकेल. शिक्षण वर्ल्ड क्लास केल्याशिवाय भारत पुढे जाणार नाही.”
‘श्रद्धा, ओळख आणि संविधान’ यावर बोलताना डॉ. तोगडिया म्हणाले, “जगात दुष्काळ, स्थलांतर आणि युद्धांमुळे संस्कृती आणि सभ्यतांची देवाणघेवाण होत राहिली आहे. भारतातही अनेक धर्म, संस्कृती आणि सभ्यता आल्या आणि एकमेकांत मिसळून गेल्या. याचा भारतालाच फायदा झाला. आपली संस्कृती पूर्वजांच्या विचारांतून, वागणुकीतून आणि जीवन जगण्याच्या पद्धतीतून घडली आहे. एवढे सगळे होऊनही आपली हिंदू ओळख कधीही बदलली नाही.”
संविधानावर ते म्हणाले, “संविधान आपण बनवले आहे. संसदेत दोन तृतीयांश बहुमताने त्यात बदल करता येतो. आतापर्यंत शंभरहून अधिक वेळा संविधानात बदल झाला आहे, त्यामुळे संविधान कधीच बदलता येत नाही, असे कोणीही म्हणू शकत नाही. गरज पडली तर हिंदू ओळखीच्या रक्षणासाठी संविधानात आणखी एक बदलही केला जाईल.”
ते पुढे म्हणाले, “संविधानानंतर कायदा येतो. कायदे संविधानाच्या पायावरच बनतात आणि सरकार कायद्यांच्या आधारे काम करते. आपण संविधान, कायदा आणि सरकार या तिन्हींचा सन्मान केला पाहिजे, पण विचार मात्र आपल्या संस्कृती, सभ्यता आणि जीवनमूल्यांनुसार केला पाहिजे.”
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी काजल हिने केले, तर डॉ. निमेश किल्लमशेट्टी यांनी आभार मानले.
बॉक्समध्ये घ्यावे
६० कोटी लोक आजारी, मानसिक आरोग्य बनले मोठे संकट
देशाच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करताना डॉ. तोगडिया म्हणाले, “आज देशात ६० कोटी लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत. यामध्ये २५ कोटी लोक उच्च रक्तदाब किंवा प्री-हायपरटेन्शन, १३ कोटी लोक मधुमेह आणि १० कोटी लोक लठ्ठपणाने ग्रस्त आहेत. सुमारे २० कोटी लोक मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत. दरवर्षी १४ हजारांहून अधिक विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. ही अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.”
ते म्हणाले, “म्हणूनच मी हनुमान चालिसा केंद्रे सुरू केली आहेत. तिथे लोकांना सोप्या भाषेत वैद्यकीय माहिती दिली जाते. निरोगी कसे राहावे आणि आजारांपासून कसे वाचावे, हे त्यांना शिकवले जाते. तिथे निरोगी आयुष्य जगायला शिकवले जात आहे.”


