*बालेवाडी क्रीडा संकुलाच्या सर्वांगीण विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही; पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाच्या योजनांचाही लाभ घ्या*
पुणे, दि. २३ : राज्यातील क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करून आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्रातील खेळाडूंनी यश संपादन करावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘मिशन लक्षवेध’ हा राज्य शासनाच्या क्रीडा विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत सुरू करण्यात येणारी सर्व केंद्रे लवकरात लवकर कार्यान्वित करावीत. आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत या योजनेच्या माध्यमातून भारताला निश्चितपणे पदक मिळवून देण्याचे उद्दिष्ट ठेवून आतापासूनच नियोजनबद्ध प्रयत्न करावेत, असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिले.
शासकीय अतिथिगृहात आयोजित ‘मिशन लक्षवेध’आणि बालेवाडी क्रीडा संकुलाच्या विकासकामांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी आमदार सुनील शेळके, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, क्रीडा आयुक्त दीपक सिंघल, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित होते.
बैठकीत बोलताना उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मिशन लक्षवेध’ ही योजना सुरू करण्यात आली आहे. राज्यातील गुणवंत खेळाडूंना योग्य प्रशिक्षण, आधुनिक सुविधा आणि आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देऊन त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकविजेते बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
बालेवाडी क्रीडा संकुलाचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी मागील अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद करण्यात आली होती. यावर्षीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे विकासकामांना गती देतानाच सर्व पायाभूत सुविधा वेळेत पूर्ण कराव्यात. केंद्र शासनाच्या विविध योजनांचाही लाभ घेऊन क्रीडा क्षेत्रासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी क्रिडा विभागातील अधिकारी उपस्थित होते.


