पुणे : वैद्यकीय, समाजकार्य आणि आरोग्यसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल डॉ. राजेंद्रप्रसाद परदेशी यांचा सन्मान करण्यात आला. सिक्कीम सरदार पटेल विद्यापीठाकडून वैद्यकीय समाजकार्य विषयातील डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (ऑनर्स) ही पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा हा सन्मान करण्यात आला.
सिद्धेश अकॅडमी, विघ्नेश सोशल फाउंडेशन आणि अखिल हिंदू राजपूत समाज संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हा सन्मान समारंभ मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, टिळक रोड, पुणे येथे आयोजित करण्यात आला. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणेच्या अध्यक्षा डॉ. अलका क्षीरसागर, पुणे महापालिकेचे उपआरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर, शिवाजीराव देशमुख, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अॅड. प्रताप परदेशी, राजपूत परदेशी समाजाचे अध्यक्ष सोमनाथ परदेशी, विघ्नेश सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र रतिलाल परदेशी, सिद्धेश अकॅडमीचे चेअरमन डॉ. संदेश पटवर्धन, राजपूत समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा जयश्री परदेशी आणि महाराणा प्रताप युवक मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर परदेशी डॉ मिलिंद भोई आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. राजेंद्रप्रसाद परदेशी यांचा मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
मंजुषा नागपुरे म्हणाल्या, राजेंद्र परदेशी यांच्यासारख्या व्यक्ती म्हणजे चालते-बोलते विद्यापीठ आहेत. आपल्या घरातील तरुणांना अशा व्यक्तींसोबत काम करण्याची संधी मिळाल्यास त्यांच्यावर उत्तम संस्कार होतील आणि त्यांना काम करण्याची योग्य दिशा मिळेल. समाजात अशा व्यक्ती घडणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, आपण कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात गेलो, तर तेथे माणसे गोळा करावी लागतात. मात्र, आज येथे जमलेली गर्दी पाहता राजेंद्र परदेशी यांच्या कार्याला मिळणारा प्रतिसाद दिसून येतो. दगडूशेठ गणपती मंदिरातील आरोग्य विभागात त्यांनी राबविलेल्या उपक्रमांचा आदर्श घेऊन महाकाल देवस्थान, शिर्डी देवस्थान तसेच अनेक देवस्थानांनी अशाच प्रकारचे उपक्रम राबविले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. राजेंद्रप्रसाद परदेशी यांनी बी.कॉम., वैद्यकीय समाजकार्य विषयातील पोस्ट ग्रॅज्युएट मास्टर डिप्लोमा, हॉस्पिटल अँड हेल्थकेअर मॅनेजमेंटमधील एमबीए तसेच वैद्यकीय समाजकार्य विषयातील पीएच.डी. असे शिक्षण घेतले आहे. सप्टेंबर २००४ पासून ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट येथे कार्यरत असून, ट्रस्टच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख व व्यवस्थापक म्हणून त्यांनी ८ लाख ६१ हजार ३१४ नागरिकांना आरोग्य सुविधांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यांच्या पुढाकारातून पुणे शहरात ट्रस्टची तीन मोफत आरोग्य सेवा केंद्रे सुरू झाली आहेत. राजपूत परदेशी समाजाचे सचिव म्हणूनही ते अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना आतापर्यंत १४ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.


