पुणे : श्रीराम जय राम जय जय राम… च्या जयघोषात पेशवेकालीन तुळशीबाग श्रीराम मंदिरात वैकुंठ चतुर्दशी च्या दिवशी पुणेकरांनी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतले. प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांच्या मूर्तीचे दर्शन वैकुंठ चतुर्दशीला गाभाऱ्यात जाऊन मिळणार असल्याने भाविकांनी सकाळपासून मोठी गर्दी केली.
श्री रामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने श्रीराम मंदिरात दरवर्षी प्रमाणे वैकुंठ चतुर्दशीला आकर्षक मंदिर सजावट व विद्युतरोषणाई करण्यात आली. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी सन १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामधे वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात, अशी माहिती श्रीरामजी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त मोरेश्वर तुळशीबागवाले यांनी दिली.


